उल्हासनगरात अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई, खतुरानी यांची प्रभाग अधिकारी पदी नियुक्ती
By सदानंद नाईक | Published: July 5, 2023 08:21 PM2023-07-05T20:21:33+5:302023-07-05T20:21:59+5:30
महापालिका प्रभाग समिती क्रं-२ च्या प्रभाग अधिकारी पदी असतांना अनिल खतुरानी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर खतूरानी यांच्यावर महापालिकेने निलंबनाची कारवाई केली होती.
उल्हासनगर : कॅम्प नं-२, शिरू चौक येथील सोनार गल्लीतील अवैध बांधकामावर महापालिका अतिक्रमण पथकाने पाडकाम कारवाई केली. मात्र बांधकाम पूर्णतः जमिनदोस्त करून गुन्हा दाखल न केल्याने, बांधकाम पुन्हा जैसे थे उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे अनिल खतुरानी यांची प्रभाग अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उल्हासनगरात आरसीसी बहुमजली अवैध बांधकामाचा सुळसुळाट झाल्याच्या तक्रारी आयुक्ता पर्यंत गेल्यावर, गेल्या महिन्यात महापालिका शौचालय जागेत झालेल्या अवैध बांधकामावर कारवाई होऊन गुन्हा दाखल झाला होता. या कारवाईने शिरू चौक व सोनार गल्ली परिसरातील अवैध बांधकामावर अंकुश येणार अशी शक्यता होती. मात्र भूमाफियांनी महापालिकेच्या पाडकाम कारवाईकडे दुर्लक्ष करून आरसीसी अवैध बांधकामे उभी राहीली. त्यापैकी एका अवैध बांधकामावर अतिक्रमण पथकाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने बुधवारी दुपारी पाडकाम कारवाई केली. तसेच इतर अवैध बांधकामावर पाडकाम कारवाईचे संकेत दिले. परिसरातील आरसीसी बहुमजली अवैध बांधकामाला स्थानिक नेत्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
महापालिका प्रभाग समिती क्रं-२ च्या प्रभाग अधिकारी पदी असतांना अनिल खतुरानी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर खतूरानी यांच्यावर महापालिकेने निलंबनाची कारवाई केली होती. गेल्या आठवड्यात त्यांची नियुक्ती प्रभाग समिती क्रं-१ च्या प्रभाग अधिकारी पदी केल्याने, सर्वस्तरातून टीका होत आहे. तसेच लिपिक पदी असलेले जेठानंद यांची थेट वर्ग-१ च्या करनिर्धारक संकलक पदी नियुक्ती करण्यात आली. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे प्रभाग समिती क्रं-२ च्या सहायक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली. महापालिकेत ९० टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे वर्ग-१ ची पदे देण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आल्याची टीका होत आहे.