लॉकडाऊनमुळे डोंबिवलीतील कोपर पुलाचे तोडकाम 15 दिवसात शक्य झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 02:32 PM2020-05-01T14:32:11+5:302020-05-01T14:32:37+5:30
रेल्वे प्रशासनाचे सहकार्य घेऊन प्रत्येक ट्रॅककरिता वाहतूक व विद्युत पुरवठा खंडीत करुन टप्याटप्याने संपूर्ण सहा ट्रॅकवरील पूलाचे तोडकाम पूर्ण करण्यात आले आहे.
कल्याण- कोव्हिड - १९ साथरोग प्रतिबंधाअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील संचार बंदीचे कालावधीत रेल्वे सेवा बंद असण्याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने, रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विनंतीनुसार महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार कोपर उड्डाणपूल पुर्नःबांधणीचे काम दि. १७/०४/२०२० पासून सुरु करण्यात आले होते.
रेल्वे प्रशासनाचे सहकार्य घेऊन प्रत्येक ट्रॅककरिता वाहतूक व विद्युत पुरवठा खंडीत करुन टप्याटप्याने संपूर्ण सहा ट्रॅकवरील पूलाचे तोडकाम पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे सेवा सुरळीत सूरू असताना सदर काम करावे लागले असते तर त्यास कमीत कमी ३ महिने कालावधी लागला असता, परंतु संचार बंदीचे कालावधीत सदर काम सुरु करण्याबाबत निर्णय झाल्याने १५ दिवसाचे कालावधीत काम पूर्ण करणे शक्य झाले आहे, पूलाच्या सबस्क्ट्रचरच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येणार असून त्यानंतर डेस्क स्लॅब पुर्नःबांधणीचे काम महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे,
सदर काम शहर अभियंता, सपना कोळी- देवनपल्ली यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता(विशेष प्रकल्प) श्री तरुण जुनेजा यांचेमार्फत सुरु असून कामाचे ठेकेदार पुष्पक रेल कन्ट्रक्शन प्रा.लि. हे आहेत. दि.२९/०४/२०२० रोजी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सदर कामाची पाहणी करून पुलाचे राजाजी पथ वरील अंडरपाससह पुर्नःबांधणीचे काम पुढील सहा महिने कालावधीत पुर्ण करणेबाबतचे निर्देश दिले आहेत. सदर काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडील अतिरिक्त रेल्वे प्रबंधक आशुतोष गुप्ता , वरिष्ठ विभागीय अभियंता ( ऊ. पु.) मळभागे यांचे विशेष सहकार्य लाभले. दि.३०/०४/२०२० रोजी रेल्वे ट्रॅक वरील तोडकाम पूर्ण झाले आहे.