शिंदे गटाच्या कंटेनर शाखांचे पाडकाम; राष्ट्रवादीची कार्यालयेही लक्ष्य, मीरा-भाईंदर पालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 05:51 AM2024-03-17T05:51:04+5:302024-03-17T05:52:16+5:30
आचारसंहिता लागताच राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर कारवाई सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी लागू होताच मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनर शाखांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनधिकृत कार्यालयांचे पाडकाम सुरू केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भाईंदर पूर्व भागात एकाच दिवशी शिंदे गटाच्या सहा कंटेनर शाखा सुरू झाल्या. या बेकायदा कंटेनर शाखांविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी कारवाईची मागणी केली होती. तक्रारींनंतरही आयुक्त संजय काटकर यांनी सर्वच क्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर कारवाई करणार, अशी भूमिका घेतली होती.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच पालिकेचे उपायुक्त, प्रभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर कारवाई सुरू केली.
भाईंदर पूर्वेच्या महात्मा जोतिबा फुले (केबिन रोड) मार्गावरील इंद्रलोक नाका, सचिन तेंडुलकर मैदानाजवळ, गोल्डन नेस्ट-आझादनगर येथील व मीरारोडच्या मीनाताई ठाकरे सभागृहाजवळील पालिकेच्या रस्ता-पदपथ आदी सार्वजनिक असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनर शाखांवर शनिवारी पालिकेने कारवाई केली. मीरारोडच्या हाटकेश भागातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनधिकृत कार्यालयावरही पालिकेने कारवाई केली.