भिवंडीत खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे पालिका मुख्यालयासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:47 AM2021-09-24T04:47:34+5:302021-09-24T04:47:34+5:30
भिवंडी - पावसाळा आला की, भिवंडी पालिका क्षेत्रातील रस्त्यांना खड्ड्यांमुळे तलावाचे रूप येते. या खड्ड्यांमुळे वाहन चालक, पादचारी, प्रवासी ...
भिवंडी - पावसाळा आला की, भिवंडी पालिका क्षेत्रातील रस्त्यांना खड्ड्यांमुळे तलावाचे रूप येते. या खड्ड्यांमुळे वाहन चालक, पादचारी, प्रवासी सर्वच त्रस्त होतात. त्याविरोधात काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका मुख्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
भिवंडी शहरात सुरू असलेले भुयारी गटार योजना व रस्त्यांचे काँक्रिटीकरण यामुळे अनेक रस्ते खोदलेल्या अवस्थेत असल्याने रस्त्यांवर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवादरम्यान शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी करूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. परिणामी नागरिकांत मनपा प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. या खड्डेमय रस्त्यांबाबत भिवंडी मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ गुरुवारी काँग्रेसचे शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी खासदार सुरेश टावरे, नगरसेवक सिराज ताहीर मोमीन, फराज बाहुद्दीन, वसीम अन्सारी, शहाफ मोमीन, अश्रफ मुन्ना, पदाधिकारी सोहेल खान, रुक्साना कुरेशी, रेहाना अन्सारी, हर्षली म्हात्रे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर अन्सारी, ओबीसी आघाडी अध्यक्ष अनंता पाटील, युवक अध्यक्ष अरफात खान सहभागी होते.
शहरातील रस्ते व उड्डाण पूल येथे खड्डे पडल्याने संपूर्ण शहरात सदैव वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तसेच खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने तो अधिकचा आर्थिक भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागत आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर उशिरा पालिका मुख्यालयात निवेदन दिले व तत्काळ खड्डे बुजविले न गेल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्यावतीने देण्यात आला आहे.