मेहतांच्या वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन, नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:28+5:302021-09-27T04:44:28+5:30
मीरा रोड : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होत असल्याचे सांगत शनिवारी वाढदिवसाचे निमित्त साधून ...
मीरा रोड : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होत असल्याचे सांगत शनिवारी वाढदिवसाचे निमित्त साधून शक्तिप्रदर्शन केले. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती कार्यक्रमाची परवानगी घेऊन प्रत्यक्षात मेहतांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन केल्याने नवघर पोलिसांनी यशवंत उर्फ अण्णा आशिनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सेवन स्क्वेअर अकादमी शाळेच्या आवारात शनिवारी मेहतांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यानिमित्ताने मेहता व समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले. महापौरांसह अनेक भाजप नगरसेवक, पालिका पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. शहरात मोठ्या संख्येने ठिकठिकाणी जाहिरात फलकही लावण्यात आले होते.
दरम्यान, मेहतांना भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी व पद दिले जाण्याची शक्यता होती. परंतु, अद्याप तरी तसे काही झालेले नाही. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास यांनी या कार्यक्रमाची आपल्याला कोणतीही कल्पना वा माहिती पक्षस्तरावर मिळाली नसल्याचे सांगितले.
भाजपचे जिल्हा कार्यालय प्रमुख या नावाने यशवंत उर्फ अण्णा आशिनकर यांनी सेव्हन स्क्वेअर अकादमी येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्याच्या कार्यक्रमासाठी परवानगी घेतली होती. परंतु, प्रत्यक्षात मेहतांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी पालिका प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांना फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. परंतु, गायकवाड न आल्याने शेवटी शनिवारी रात्री पोलिसांनीच आशिनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.