शिंदे यांच्या समर्थकांचे ठाण्यात शक्तिप्रदर्शन, जमावबंदी धाब्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 06:53 AM2022-06-26T06:53:08+5:302022-06-26T06:53:24+5:30
शहराच्या विविध भागांतून शिंदे समर्थकांचे जत्थे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सहभागी होत होते. ‘निर्णय तुमचा, पाठिंबा आमचा’, ‘आम्ही भाई समर्थक’ असे आशय असलेले बॅनर कार्यकर्त्यांनी हाती घेतल्याचे दिसत होते. काहींच्या हातात बाळासाहेबांचे फोटो, तर काहींच्या हाती आनंद दिघे यांचे फोटो दिसत होते.
ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शनिवारी ठाण्यातील शिंदे समर्थक एकवटले. लुईसवाडी येथील त्यांच्या बंगल्याबाहेर हातात भगवा झेंडा, धनुष्यबाणाचे चिन्ह आणि ‘अनाथांचा नाथ एकनाथ’ हे गाणे यावर शिवसैनिक एकवटले होते. ‘एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशी घोषणाबाजी शेकडो शिंदे समर्थकांनी केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यात सहभागी झाले. माजी नगरसेवकांसह, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि पदाधिकारी देखील सहभागी झाले.
शहराच्या विविध भागांतून शिंदे समर्थकांचे जत्थे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सहभागी होत होते. ‘निर्णय तुमचा, पाठिंबा आमचा’, ‘आम्ही भाई समर्थक’ असे आशय असलेले बॅनर कार्यकर्त्यांनी हाती घेतल्याचे दिसत होते. काहींच्या हातात बाळासाहेबांचे फोटो, तर काहींच्या हाती आनंद दिघे यांचे फोटो दिसत होते. जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाल्यानंतरही शिंदे समर्थक घोषणाबाजी करीत होते.
शिंदे समर्थकांमध्ये माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे यांच्यासह योगेश जानकर, विलास जोशी, गणेश साळवी आदींसह इतर काही महत्त्वाचे माजी नगरसेवक सहभागी झाले होते. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जमावबंदी धाब्यावर -
मुंबई, ठाणे शहरात १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. शिंदे समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले तेव्हा ठाणे पोलीस बंदोबस्ताला हजर होते व त्यांच्यासमोरच जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन होताना त्यांनी पाहिले, अशी चर्चा सुरू होती.