भिवंडीत तलाठी संघटनेची निदर्शने; दैनंदिन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 06:30 PM2021-10-11T18:30:50+5:302021-10-11T18:30:58+5:30
उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची राज्य समन्वयक पदावरून तात्काळ अन्यत्र बदली करावी या करीता सात ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू असून पहिल्या टप्प्यात सात ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून काम केले.
- नितिन पंडीत
भिवंडी- ई-फेरफार, ई चावडी व ई-पिक प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना पदाधिकारी यांच्या बद्दल केलेल्या अर्वाच्य व असंसदिय विधानाबद्दल व वागणुकीबाबत त्यांची राज्य समन्वयक पदावरून तात्काळ बदली करण्यात यावी त्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू केले असून सोमवारी भिवंडी तहसीलदार कार्यालया समोर महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष आगीवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करीत आंदोलन केले आहे .
उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची राज्य समन्वयक पदावरून तात्काळ अन्यत्र बदली करावी या करीता सात ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू असून पहिल्या टप्प्यात सात ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून काम केले, त्यानंतर सोमवारी निषेध आंदोलन करण्यात आले असून मंगळवारी डिजिटल सातबारा बनविणे कामी उपयोगात येणारी संगणकीय डी एस सी यंत्रणा तहसीलदारांकडे जमा करण्यात येणार असून १३ ऑक्टोबर पासून नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामे वगळता सर्व कामांवर तलाठी कर्मचारी बहिष्कार टाकणार असल्याची माहिती तलाठी संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष आगीवले यांनी दिली आहे .
भिवंडी तहसीलदार कार्यलया समोर झालेल्या या आंदोलनात तलाठी संघाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष सुधाकर कामडी, जिल्हा संघटक योगेश भोजने, राज्य अप्पर चिटणीस अशोक दूधसाखरे,तालुका सचिव नारसुबा तुगावे यांसह तालुक्यातील सर्व तलाठी सहभागी झाले होते . यावेळी आपल्या मागणीची लेखी निवेदन भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्यासह भिवंडी प्रांत अधिकारी कार्यालयात देण्यात आले.