Maharashtra Political Crisis: आनंद मठाजवळ झाले जाेरदार शक्तिप्रदर्शन, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 10:59 AM2022-06-28T10:59:18+5:302022-06-28T11:00:09+5:30
जांभळी नाकापासून टेंभी नाक्यापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक सोमवारी सकाळपासून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून काही काळ बंद करण्यात आली होती.
ठाणे : शिवसेना किसन नगर शाखेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी सोमवारी ‘चलो आनंद आश्रम’, असे आवाहन केल्याने शेकडो शिंदे समर्थकांनी शक्तिस्थळापाशी शक्तिप्रदर्शन केले. त्या पार्श्वभूमीवर सकाळपासून आनंद आश्रम परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. सकाळपासूनच येथे शिंदे समर्थकांनी जमण्यास सुरुवात केली. शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे आनंद मठात आल्यावर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर हे सर्व एकत्र आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर गेले. तेथे शिंदे समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
जांभळी नाकापासून टेंभी नाक्यापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक सोमवारी सकाळपासून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून काही काळ बंद करण्यात आली होती. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सोडले तर अन्य कोणालाही या मार्गावर पोलीस सोडत नव्हते. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेला आनंद आश्रम ठाण्यातील शिवसेनेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या आनंद आश्रमातून दिघे न्यायनिवाडा करीत, याच वास्तुतून अनेक महत्त्वाचे राजकीय डावपेच आखले जात होते. शिंदे यांनी केलेल्या बंडाला समर्थन दर्शवण्यासाठी सोमवारी सकाळपासून शिंदेसमर्थक, ज्येष्ठ शिवसैनिक यांनी आनंद आश्रमात गर्दी केली होती.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी, हेमंत पवार, माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, माजी महापौर संजय मोरे, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, मीनाक्षी शिंदे यांसह अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.