खाजगीकरणाविरोधात कामगार संघटनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:27 PM2018-12-14T23:27:54+5:302018-12-14T23:28:08+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेने चार प्रभागक्षेत्रांतील कचरा उचलण्याचे १०७ कोटींचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने चार प्रभागक्षेत्रांतील कचरा उचलण्याचे १०७ कोटींचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले आहे. या खाजगीकरणाविरोधात म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे शुक्रवारी महापालिका मुख्यालयात निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील, प्रकाश पेणकर, सुनील पवार, कार्याध्यक्ष अजय पवार आदी कामगार सहभागी झाले होते. यावेळी कामगारांनी महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. कंत्राटीपद्धतीने कामगार भरले जातात. तसेच खाजगी कंत्राटदाराला कचरा उचलण्याचे काम दिले जाते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. कामावर असताना मृत्यू झालेल्या महापालिकेच्या कामगारांच्या वारसांना कामावर घेतले जात नाही. निवृत्तीनंतर रिक्त झालेली पदे पुन्हा भरली जात नाहीत. त्यामुळे सफाई कामगारांची संख्या लोकसंख्येच्या निकषानुसार ५० टक्केच आहे. उर्वरित ५० टक्क्यांचा अनुशेष महापालिका भरत नाही. त्यासाठी खासगीकरण करून कंत्राटदारांचे खिशे भरले जातात. या भ्रष्टाचारात अधिकारी असून त्यांची चौकशी केली झाली पाहिजे, अशी मागणी संघटनेने यावेळी केली.
कंत्राटी पद्धतीसह खाजगीकरणास विरोध करणाऱ्या संघटनेतर्फे कामगारांना आश्वासित प्रगती योजनाचा लाभ दिला जावा, कामगारांचे वेतन बँकेत जमा करण्यात यावे, कामगारांचा आकृतिबंद तयार करावा, शिपाई, सुरक्षा रक्षक व कामगारांना लिपिक पदावर पदोन्नतीबरोबच त्यांना गणवेश, गमबूट, चप्पल, झाडू, छत्री आदी साहित्य वेळेत दिले जावे, सेवा शर्ती भरतीविषयी सरकारने तात्काळ मंजुरी घ्यावी, सेवानिवृत्त होणाºया कामागारांची देय रक्कम त्याच दिवशी दिली जावी, त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे या विविध मागण्यांचे निवेदन संघटनतर्फेआयुक्त गोविंद बोडके यांना देण्यात आले.