केडीएमसीतील लेखा विभागातील महिला अधिका-याचा डेंग्यूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:39 AM2017-09-24T00:39:16+5:302017-09-24T00:39:20+5:30
केडीएमसीतील लेखा विभागातील महिला अधिकारी श्वेता सिंघासने (रा. अंबरनाथ) यांचा शुक्रवारी डेंग्यूने मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
कल्याण : केडीएमसीतील लेखा विभागातील महिला अधिकारी श्वेता सिंघासने (रा. अंबरनाथ) यांचा शुक्रवारी डेंग्यूने मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि सून असा परिवार आहे.
सिंघासने सोमवारपासून तापामुळे आजारी होत्या. तापाचे निदान केले असता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना प्रथम अंबरनाथमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, कल्याणमधील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिंघासने यांनी काही काळ महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयाच्या प्रभाग अधिकारीपदाचा कार्यभारही सांभाळला होता. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच महापौर राजेंद्र देवळेकर, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, नगरसेवक प्रकाश पेणकर, नगरसेविका खुशबू चौधरी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
आमची हद्द नाही
डेंग्यूमुळे महापालिकेतील अधिकाºयाचाच मृत्यू झाल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात नसल्यानेच डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. दुसरीकडे यासंदर्भात महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे म्हणाल्या, सिंघासने या अंबरनाथ येथे राहतात. त्यामुळे ही डेंग्यूची केस केडीएमसी हद्दीतील नाही. मात्र, सिंघासने यांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे खासगी रुग्णालयाने महापालिकेस कळवले आहे.