एकाच घरातील पाच जणांना डेंग्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 05:52 AM2019-11-15T05:52:59+5:302019-11-15T05:53:10+5:30
पूर्वेकडील वालधुनी शिवाजीनगरमधील एकाच घरातील पाच जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
कल्याण : पूर्वेकडील वालधुनी शिवाजीनगरमधील एकाच घरातील पाच जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. शिवाजीनगरमधील लक्ष्मी चंद्रकांत टोकेकर (५४), त्यांची मुले गणेश (३३), विनोद (३८) आणि नातवंडं मृणाल (६), सई (१०) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. यातील लक्ष्मी आणि गणेश यांच्यावर सोमवारपासून पूर्वेकडील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, विनोद यांना केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दोन्ही लहान मुलींना डेंग्यू झाल्याचे गुरुवारी निदान झाले आहे. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू असून, त्यांना शुक्रवारी उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात नेले जाणार आहे, अशी माहिती कुटुंबातील निखिल टोकेकर यांनी दिली.
दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, कॉलरा आदी साथीच्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणात होत असते. महापालिकेसह शहरांमधील खाजगी रुग्णालयांमध्येही या रुग्णांची संख्या वाढत असते. यंदाच्या पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा आढावा घेता जून ते आजपर्यंत विविध तापांचे एकूण २२ हजार ८१३ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्येही कमालीची वाढ झाली आहे. पावसाळा थांबल्यावरच डेंग्यूची लागण होते. वातावरणात झालेला बदल हे डेंग्यूचा फैलाव व्हायला कारणीभूत ठरतो. साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. दरम्यान, आता एकाच घरातील पाच व्यक्तींना डेंग्यूची झालेली लागण पाहता केडीएमसी कोणती कार्यवाही करते, याकडे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात केडीएमसीचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवंगारे म्हणाले, ‘आमचे वैद्यकीय पथक तत्काळ घटनास्थळी जाऊन तपासणी करेल. तसेच खाजगी रुग्णालयातही भेट देऊन आढावा घेईल.’