कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डॉक्टरलाच डेंग्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 02:29 AM2017-10-15T02:29:21+5:302017-10-15T02:29:29+5:30
केडीएमसीच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात साथीचे रोग नियंत्रणात आणण्याचे काम करणाºया डॉ. सीमा जाधव यांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे.
कल्याण : केडीएमसीच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात साथीचे रोग नियंत्रणात आणण्याचे काम करणाºया डॉ. सीमा जाधव यांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे.
डॉ. सीमा या चिकणघर परिसरात साथ रोग नियंत्रणात तपासणीकरिता येणाºया रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्याचे काम करत होत्या. तीन दिवसांपासून ताप असल्याने त्या आजारी पडल्या. हा ताप डेंग्यूचा असल्याने त्यांना तातडीने कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेचे गटनेते व माजी महापौर रमेश जाधव यांची सीमा ही मुलगी आहे. सीमा यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे गटनेते जाधव यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत व वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांना कळवले आहे. मात्र, त्यानंतरही त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. साधी त्यांची चौकशीही केली नसल्याचे गटनेते जाधव यांनी सांगितले.
साथीचे आजार बळावले : परतीच्या पावसामुळे साथीच्या रोगांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्याचीच शिकार डॉ. सीमा झाल्या आहेत. कल्याण पूर्वेला महापालिकेकडून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचा दावा गटनेते जाधव यांनी केला आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
महापालिकेच्या लेखा विभागातील अधिकारी श्वेता सिंगासने यांचा काही दिवसांपूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. मात्र, त्यांचा मृत्यू महापालिका हद्दीत झाला नाही, असे सांगून महापालिकेच्या आरोग्य विभागाने हात वर केले.