दंतचिकित्सकाची आत्महत्या की हत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:26 AM2017-07-18T02:26:12+5:302017-07-18T02:26:12+5:30
पांडुरंगवाडीच्या ‘आदित्य हाइट्स’मध्ये राहणारे दंतचिकित्सक डॉ. सचिन कारंडे रविवारी रात्री घरात बेशुद्धावस्थेत आढळले. कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पांडुरंगवाडीच्या ‘आदित्य हाइट्स’मध्ये राहणारे दंतचिकित्सक डॉ. सचिन कारंडे रविवारी रात्री घरात बेशुद्धावस्थेत आढळले. कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
डॉ. कारंडे यांचे चुलत भाऊ कुणाल (रा. शंखेश्वरनगर, डोंबिवली पूर्व) यांनी रविवारी रात्री त्यांच्याशी वारंवार फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कुणाल यांनी डॉ. कारंडे यांचे घर गाठले. दरवाजा ठोठावूनही डॉ. कारंडे यांनी प्रतिसाद न दिल्याने कुणाल यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा ते घरात बेशुद्धावस्थेत आढळले. उपचारासाठी त्यांना आधी आयकॉन आणि नंतर रुक्मिणीबाई रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल, असे टिळकनगर पोलिसांनी सांगितले.
डॉ. कारंडे यांची डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड आणि श्रीखंडेवाडी परिसरात क्लिनिक आहेत. ते १५ वर्षांपासून दंतचिकित्सक म्हणून काम करत होते. ते इंडियन डेंटिस्ट असोसिएशनचे सदस्य होते. डॉ. कारंडे यांच्या अकाली मृत्यूच्या बातमीने त्यांचे नातेवाईक व सहकाऱ्यांना धक्का बसला आहे.