नकार असतानाही शिक्षण विभाग हलविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:17 AM2019-08-08T00:17:54+5:302019-08-08T00:18:04+5:30
समिती आणि महासभेचे आदेश धाब्यावर; आयुक्तांच्या निषेधार्थ सभा तहकूब
कल्याण : केडीएमसी मुख्यालयातील शिक्षण विभागाचे कार्यालय हटविण्यास शिक्षण समितीने मनाई केली असताना, तसेच महासभेचे आदेश असतानाही आयुक्त गोविंद बोडके यांनी कार्यालय झोजवाला कॉम्प्लेक्समध्ये हलविले. आयुक्तांच्या या मनमानी कारभाराचा बुधवारी पार पडलेल्या शिक्षण समितीच्या सभेत निषेध करण्यात आला. जोपर्यंत आयुक्त निर्णय बदलत नाहीत, तोपर्यंत सभा होणार नाही, असे स्पष्ट करीत सभापती नमिता पाटील यांनी सभा तहकूब केली.
स्मार्ट सिटीचे कार्यालय केडीएमसीच्या मुख्यालयात हलविण्याचा आणि तेथील कार्यरत असलेले काही विभाग अन्यत्र हलविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतला आहे. पण, मुख्यालयातील शिक्षण विभाग हटवू दिला जाणार नाही, असा पवित्रा सभापती पाटील यांनी जूनमध्ये झालेल्या शिक्षण समितीच्या पहिल्या सभेत घेतला होता. तर, नुकत्याच झालेल्या महासभेतही शिक्षण विभाग हलविण्याचा हट्ट प्रशासनाने थांबवावा, असे सदस्यांनी सांगताना कार्यालय अन्यत्र हलविण्यास सक्त विरोध केला होता. यानंतरही आयुक्त बोडके यांनी हे कार्यालय सहजानंद चौकातील झोजवाला कॉम्प्लेक्समध्ये हलविले. त्याचे पडसाद बुधवारच्या शिक्षण समितीच्या सभेत उमटले.
शिक्षण विभागाचे कार्यालय मुख्यालयातून हलविण्याच्या प्रशासनाकडून घडलेल्या कृतीचा सदस्य छाया वाघमारे यांनी निषेध केला. आयुक्तांच्या या एकाधिकारशाहीचा निषेध म्हणून सभा तहकूब करण्यात यावी, अशी प्रस्ताव सूचना वाघमारे यांनी सभागृहात मांडली. यावर अन्य सदस्यांनीही आयुक्तांच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली. शिक्षण समिती आणि महासभेने कार्यालय हटविण्यात येऊ नये, असे आदेश दिले असतानाही आयुक्तांनी कार्यालय हलविले, हे चुकीचे असल्याकडे सर्वांनी लक्ष वेधले. महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, स्थायी समिती सभापती, पालिकेचे गटनेते ही सर्व कार्यालये मुख्यालय परिसरात असताना शिक्षण विभागाचे कार्यालय हटविण्याबाबत आयुक्तांचा अट्टहास का, असाही सवाल सदस्यांनी केला.
सभापती पाटील यांनी तर आयुक्तांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करताना जोपर्यंत आयुक्त आपला निर्णय बदलत नाही, तोपर्यंत सभा चालविली जाणार नाही, असा पवित्रा घेतला. त्याचबरोबर वाघमारे यांच्या सभा तहकुबीच्या प्रस्तावाला मान्यता देत सभा तहकूब
केली. आयुक्तांच्या कृतीबाबत उपायुक्त मिलिंद धाट यांनी खुलासा करावा, अशीही मागणी सदस्यांकडून करण्यात आली. त्यावर सदस्यांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहोचविल्या जातील, असे धाट यांच्याकडून सांगण्यात आले.
सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली
दरम्यान, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शिक्षण समितीच्या सभेत सभापती, सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या वतीने स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.