भूस्खलनानंतर जागे झालेल्या विभागाने घोलाईनगरात १० झोपड्या तोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:28 AM2021-09-02T05:28:15+5:302021-09-02T05:28:15+5:30
ठाणे : घोलाईनगरमध्ये बुधवारी पुन्हा एकदा भूस्खलनाची घटना घडून आठ वर्षीय चिमुकली किरकोळ जखमी झाल्यानंतर या पट्ट्यात पुन्हा एकदा ...
ठाणे : घोलाईनगरमध्ये बुधवारी पुन्हा एकदा भूस्खलनाची घटना घडून आठ वर्षीय चिमुकली किरकोळ जखमी झाल्यानंतर या पट्ट्यात पुन्हा एकदा वनविभाग आणि ठाणे महापालिकेने संयुक्तिकपणे केलेल्या या कारवाईत अवघ्या १० झोपड्यांवर कारवाई केली. त्यामुळे ही कारवाई म्हणजे फार्स असल्याची चर्चा आहे.
कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत असलेल्या घोलाईनगरमध्ये काही दिवसांपूर्वीच भूस्खलन होऊन पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभाग आणि ठाणे महापालिकेवर टीका झाली होती. हा सर्व पट्टा वनविभागाअंतर्गत येत असल्याने सर्व्हे करून या सर्व कच्च्या आणि पक्क्या झोपड्यांवर कारवाईचा निर्णय झाला होता. यावेळी तीव्र उतारावरील काही झोपड्यांवर कारवाईदेखील केली होती. मात्र, मध्यंतरी ही कारवाई पूर्णपणे थंडावली. आता या भागात पुन्हा भूस्खलन होऊन एक आठ वर्षांची चिमुरडी जखमी झाल्यानंतर वनविभागाला जाग आली. यानुसार बुधवारी ठाणे महापालिका आणि वनविभागाने १० कच्च्या आणि पक्क्या झोपड्यांवर कारवाई केल्याची माहिती कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.