डेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून
By जितेंद्र कालेकर | Published: August 19, 2018 10:19 PM2018-08-19T22:19:18+5:302018-08-19T22:27:03+5:30
एखाद्याने पेट्रोल भरल्यानंतर त्याच्या डेबिट कार्डच्या पासवर्डवर नजर ठेवून नंतर स्कॅमर मध्ये कार्डमधील डेटा कॉपी करुन प्लास्टीकच्या कार्डच्या आधारे एटीएममधील रोकड लुटणा-या टोळीतील मन्नू सिंगला गुजरात पोलिसांच्या मदतीने ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
जितेंद्र कालेकर
ठाणे: खिशातील स्कॅमरच्या आधारे प्लास्टीक कार्डचा वापर करुन ठाण्यातील एका खातेदाराच्या बँकेतील ४० हजारांची रोकड सूरत मधील एटीएम केंद्रामधून हाडपणा-या मन्नू सिंग (२४, रा. कांदिवली, मुंबई) याला गुजरात पोलिसांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी अलिकडेच अटक केली आहे. त्याला २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
गुजरातमधील सूरत शहरातील सचिन पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या एका एटीएम केंद्रातून काही रोकड काढल्यानंतर पलायनाच्या तयारीत असलेल्या मन्नू या मुळच्या अजमगढ, उत्तरप्रदेशातील भामटयाला सचिन पोलिसांनी सापळा लावून १२ आॅगस्ट २०१८ रोजी अटक केली. त्याला त्यांनी ‘बोलते’ केल्यानंतर त्याने काढलेली ४० हजारांची रोकड ही ठाण्याच्या खारकर अळीतील एका रहिवाशाची असल्याचे उघड झाले. हीच माहिती गुजरात पोलिसांनी ठाणे पोलिसांना दिल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने त्याला १३ आॅगस्ट रोजी गुजजातमधून ताब्यात घेतले. ठाण्याच्या एका पेट्रोल पंपावर आठ हजारांमध्ये नोकरी करीत असतांना एका भामटयाने काही पैशांचे अमिष दाखवून त्याला या जाळयात ओढल्याचा दावा अटक झाल्यानंतर त्याने पोलिसांकडे केला.
..............................
अशी होती एमओबी...
एखाद्याने तीन हात नाका येथील पेट्रोल पंपावर डेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरणा करते वेळी सिंगची या कार्ड धारकांवर ‘नजर’ असायची. पेट्रोल भरण्यासाठी येणाºयाकडून कार्ड स्वाईप करण्यासाठी घेतले की, गाडी थोडी पुढे करण्यासाठी तो सांगायचा. त्याचवेळी इकडे त्याच्याकडील स्कीमरला कार्ड लावून त्यातील डेटा कॉपी करायचा. कार्ड स्वॅप करण्यासाठी मशिनला टाकतांना त्याचा पासवर्ड तो लक्षात ठेवायचा. पैसे भरल्याच्या दोन पावत्या निघाल्यानंतर त्यातील एका पावतीवर तो हा पासवर्ड ग्राहकाच्या नकळत लिहून ठेवीत असे. घरी गेल्यानंतर मॅग्नेट कार्ड रिडर आणि यूएसबीच्या मदतीने स्कीमरमधील कॉपी केलेला डेबिट कार्डचा डाटा लॅपटॉपमध्ये उतरविला जायचा. त्याचवेळी एका प्लास्टीक कार्डमध्येही हा डेबिट कार्डचा डाटा कॉपी केला जातो. आधीच मिळविलेल्या पासवर्डच्या आधारे कोणत्याही शहरातील निर्जन ठिकाणी असलेल्या एटीएम केंद्रातून रात्री पावणे १२ वाजता आणि रात्रीच्याच १२ नंतर काही मिनिटांनी असे दोन वेळा पैसे काढून सिंग आणि त्याचे साथीदार पसार होत होते. एकमेकांची विशेष माहिती नसतांनाही केवळ ठराविक कोड वर्डच्या आधारे सिंग आणि त्याचे इतर तीन साथीदार संपर्कात होते. पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांचे पथक आता त्याच्या उर्वरित तीन साथीदारांचा शोध घेत आहेत. नागरिकांनी डेबिट कार्डचा वापर करतांना काळजीपूर्वक आणि पासवर्ड टाकतांनाही विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन निरीक्षक सोंडकर यांनी केले आहे.