महावितरणने थकवली गणेशोत्सव मंडळांची अनामत रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:19 AM2019-07-26T00:19:03+5:302019-07-26T00:19:12+5:30
समन्वय समितीचा आरोप : वीजपुरवठ्यासाठी ५० मीटरची वायर
ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी महावितरणकडून अनेक मंडळे तात्पुरत्या स्वरूपात वीज घेतात. त्याचे बिलही भरतात. तरीही, शहरातील तब्बल ७५ टक्के मंडळांची मागील पाच ते सहा वर्षांपासूनची अनामत रक्कमच महावितरणने दिली नसल्याचा आरोप गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी समीर सावंत यांनी गुरुवारी केला. त्यावर, महापौर मीनाक्षी शिंदे यांनीसुद्धा महावितरणला खडेबोल सुनावून मंडळांची अनामत रक्कम वेळेत न दिल्याने तुमच्यावर काय कारवाई करायची, असा सवाल केला.
ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुरुवारी सायंकाळी गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजिली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर मीनाक्षी शिंदे होत्या. त्यांच्यासमवेत स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, भाजपचे गटनेते नारायण पवार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले तसेच वाहतूक विभाग, पोलीस, अग्निशमन दल आणि महावितरणचे पदाधिकारी यांच्यासमवेत गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महावितरणवर सावंत यांनी हा आरोप केला.
आम्ही नियमाने परवानगी घेत असतो. परवानगी घेतल्यानंतर अनामत रक्कमही भरतो. जे बिल येते ते सुद्धा भरतो. मात्र, मागील पाच ते सहा वर्षांपासून अनामत रक्कमच परत केली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, गणेशोत्सव मंडळांसाठी ३० मीटरपर्यंतच वायर पुरविली जाते, ती मर्यादाही वाढविण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ज्यांची अनामत रक्कम शिल्लक असेल, ती परत केली जाईल, यासाठी मंडळांनी अर्ज करावेत, असे सांगितले. तसेच महावितरणची तात्पुरती जोडणी मिळविण्यासाठी संबंधित शाखा अभियंत्याकडेच अर्ज करावा आणि ३० मीटरऐवजी ५० मीटरपर्यंतची वाढीव परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी मान्य केले. याच मुद्यावरून महापौर मीनाक्षी शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. अनामत रक्कम न देणाºया अधिकाºयांवर काय कारवाई करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही अनामत रक्कम वेळेत परत करण्यात यावी आणि यापुढेही अनामत रक्कम ३० दिवसांच्या आत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना केल्या.
नवीन मंडळांवर लक्ष ठेवा
महापालिकेने वेळेत परवानगी देताना वाहतूक विभाग आणि अग्निशमन विभागानेही वेळेत परवानगी द्यावी. मंडळांनीही एक महिन्याच्या आत परवानगीसाठी अर्ज सादर करावेत, अशी सूचनाही महापौरांनी केली. तर, रजिस्टर मंडळांपेक्षा नवीन मंडळांची भर मागील काही वर्षांत जास्त पडत आहे. या मंडळांवरदेखील योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत. या मंडळांच्या माध्यमातून केवळ उत्सवाच्या काळात पावत्या फाडल्या जातात आणि उत्सवाच्या काळात नको ते प्रकार त्यांच्याकडून घडत असतात. त्यामुळे अशा मंडळांवर अंकुश ठेवण्यासाठी लक्ष ठेवून योग्य ती पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. गणेशोत्सव विसर्जनासाठी रस्त्याच्या बाजूची एक लेन सेपरेट ठेवण्यात यावी, रात्री १२ च्या आत मंडळांनी गणपती विसर्जन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अर्जांचा निपटारा तत्काळ होणार
गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या अर्जांचा निपटारा प्रभाग समितीनिहाय दोन ते तीन दिवसांत केला जाणार आहे. त्यानुसार, वाहतूक विभाग आणि अग्निशमन विभागानेही मंडळांना नाहरकत दाखला तत्काळ देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. त्यानुसार, त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन या दोनही विभागांकडून देण्यात आले. याशिवाय, शाडूच्या, कागदाच्या मूर्तींना प्राधान्य देणे, वृक्षांच्या फांद्या वेळेत छाटणे, शाडूच्या किंवा कागदापासून मूर्ती तयार करणाºयांना अनुदान उपलब्ध करून देणे आदींसह इतर मुद्यांवरसुद्धा यावेळी चर्चा झाली.