बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
By जितेंद्र कालेकर | Published: September 26, 2024 08:43 PM2024-09-26T20:43:00+5:302024-09-26T20:43:18+5:30
जखमी पोलीस अधिकाऱ्यांची शर्मिला ठाकरे यांनी भेट घेऊन प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
ठाणे : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने गोळीबारात जखमी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलेले प्रत्येकी ५१ हजारांचे बक्षीस स्वीकारण्यास दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला. ही रक्कम पोलीस कल्याण निधीमध्ये जमा करण्याची सूचना त्यांनी शर्मिला ठाकरे यांना केली आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत मनसेच्या वतीने या बक्षिसाचा धनादेश पोलिस कल्याण निधीमध्ये जमा करणार असल्याची माहिती मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी दिली.
बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या चकमकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे हे दोघे जखमी झाले. जखमी पोलीस अधिकाऱ्यांची शर्मिला ठाकरे यांनी भेट घेऊन प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.