श्वानप्रेमींमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:04 AM2018-09-19T04:04:08+5:302018-09-19T04:04:32+5:30
१९ ते २५ सप्टेंबरदरम्यान राबविणार विशेष मोहीम
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : श्वानप्रेमी हौशीने घरात श्वान पाळतात. मात्र, अनेकांमध्ये त्यांच्या लसीकरणाविषयी उदासीनता आहे. घरातील पाळीव श्वानही दंश करतात. त्याचे प्रमाणे भटक्या श्वानांपेक्षा जास्त आहे. मात्र, ते उघड होत नाही, अशी माहिती प्राण्यांचे डॉक्टर मनोहर अकोले यांनी १९ ते २५ सप्टेंबर या श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण जनजागृती मोहिमेनिमित्त दिली.
केडीएमसी हद्दीत १२ ते १३ हजार पाळीव श्वानधारक आहेत. पाळीव श्वान कुणाला चावत नाही, अशी त्यांच्या मालकांची समजूत असते. श्वानाचे दरवर्षी लसीकरण आवश्यक आहे. श्वान मालकांमध्ये त्याविषयी जागृती झाली पाहिजे. महापालिकेतर्फे श्वान निर्बिजीकरण केंद्रही योग्य पद्धतीने चालविले जात नाही. त्यामुळे सामाजिक संस्थांना पुढाकार घेऊन श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम हाती घ्यावी लागत आहे, असे अकोले यांनी सांगितले.
डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागात ७७ श्वानप्रेमी आहेत. प्रत्येक जण लसीकरणासाठी अंदाजे १० ते १२ श्वानांना आणतात. सामाजिक संस्थांतर्फे घेतल्या जाणाऱ्या सप्ताहात ९०० श्वानांना लसीकरण केले जाते. हा आकडे पुरेसा नाही. मात्र, यामुळे समाजात जागृती होण्यास मदत होते. या सप्ताहात भटक्या श्वानांना दत्तक घेणारे, तसेच त्यांना खाऊ घालणारेही पुढाकार घेऊन श्वानांना लसीकरण करून घेतात.
लसीकरण केल्यामुळे चावा घेणाºया श्वानांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कोणत्या श्वानांना लसीकरण केले आहे, हे नीटसे सांगता येणार नाही. पण विभागानुसार श्वानांची नोंदणी केली जाते. श्वानप्रेमींनाही त्याची माहिती असते, असे अकोले म्हणाले.
रोटरी क्लब आॅफ डोंबिवली मिडटाउनतर्फे १९ ते २५ सप्टेंबरदरम्यान डोंबिवली व परिसरातील भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यात श्वानप्रेमी, प्राणीमित्र, राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. केडीएमसीचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ होईल. २८ सप्टेंबरला एका फेरी काढण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम गुलाब पावले, कैलाश सोनावणे, डॉ. अकोले यांच्या पुढाकाराने होणार आहे.
रेबिजमुळे वर्षाला ३५ हजार जणांचा मृत्यू
रेबिज झालेला श्वान एखाद्या व्यक्तीला चावल्यास ती व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते. सध्या देशात दरवर्षी ३५ हजार लोक मरण पावतात. तरीही लसीकरणाविषयी अनास्था दिसून येते.