तुर्फेपाडा झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी वंचितचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:00 AM2020-01-17T00:00:53+5:302020-01-17T00:01:05+5:30
पुनर्वसनाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडून निवेदन
ठाणे : घोडबंदर रोडवरील शासकीय भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांना लागलेल्या आगीत ५५ झोपड्या खाक झाल्या होत्या. या झोपडीधारकांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. तसेच, त्यांना कोणत्याही प्रकारची मदतही जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. यामुळे या झोपडीधारकांना मदत देण्यात यावी, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
घोडबंदर रोडवरील तुर्फेपाडा येथे ब्रह्मांड फेज-२ चे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या शिवनेरी इमारतीजवळील मोकळ्या शासकीय भूखंडावर पत्र्यांची बेकायदा घरे उभारली आहेत. याच झोपड्यांना ३ जानेवारी रोजी काही समाजकंटकांनी आग लावली होती. या आगीत सुमारे ५५ झोपड्या खाक झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधित गुन्हेगारांवर अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केलेली आहे. मात्र, या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचे अर्थसाहाय्य प्रशासनाने दिलेले नाही. तलाठ्यांनी पंचनामा केला असला, तरी अॅट्रॉसिटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तहसीलदार आणि समाजकल्याण अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अत्याचारग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी तरतूद असतानाही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्याने हा मोर्चा काढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
असा निघाला मोर्चा : ठाणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाची सुरु वात झाली. तो राममारु ती रोडमार्गे गडकरी रंगायतनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. यावेळी आंदोलकांनी सुमारे तीन तास धरणे आंदोलन केले. या मोर्चामध्ये सुखदेव उबाळे, अॅड. किशोर दिवेकर, चंद्रकांत कांबळे, सुरेश कांबळे, उन्मेष बागवे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकºयांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.