इम्पॅक्ट... उपायुक्त, शिक्षणाधिकाऱ्यांनी केली टेंभी नाका शाळेची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 07:42 AM2023-07-19T07:42:12+5:302023-07-19T07:42:34+5:30
भंगार हटवून जागा करणार मोकळी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : टेंभी नाक्यावरील महापालिकेच्या शाळेतील भीषण दुरवस्थेबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शिक्षण विभागाला खडबडून जाग आली. ‘ना छप्पर, ना प्रयोगशाळा’ या मथळ्याखालील या वृत्ताची तातडीने दखल घेत ठाणे महापालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त आणि शिक्षणाधिकारी यांनी शाळा क्रमांक १७ मध्ये ताबडतोब धाव घेऊन पाहणी केली. या शाळेची त्वरित दुरुस्ती केली जाणार आहे, तर शाळा क्र. १६ ला भेट देऊन आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शिक्षण विभागाचे उपायुक्त उमाकांत गायकवाड आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी तातडीने पाहणी केली. सकाळी राक्षे यांनी भेट दिली. त्यानंतर गायकवाड यांनी दुपारी सर्व परिस्थिती पाहिली. गळणाऱ्या वर्गखोल्यांमधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गांमध्ये बसवले जाणार आहे.
शाळेमध्ये रचून ठेवलेले भंगार काढून खोल्या रिकाम्या केल्या जातील. रिकाम्या जागेत मुख्याध्यापकांना बसण्याची जागा आणि प्रयोगशाळेसाठी खोली दिली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त गायकवाड यांनी दिली.
याआधीही शिक्षण विभागाने प्रभाग समितीकडे दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु, या वृत्तानंतर प्रशासनाला जाग आली असून, त्यांनी दुरुस्तीचे काम मनावर घेतले आहे. शाळा क्रमांक १६ ची लवकरच पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी घेतली शाळा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड परिसरातील पालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था कशी बिकट आहे, याचा आढावा लोकमतने मंगळवारच्या अंकात घेतला आणि यंत्रणा हलल्या. काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कुठे बैठका झाल्या, अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही शाळांतील विद्यार्थ्यांचे वर्ग बदलले गेले. यामुळे परिस्थिती बदलेल अशी आशा शिक्षक, विद्यार्थी, पालकांना आहे...