अनधिकृत बांधकाम कारवाई दरम्यान मनपा अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 00:40 IST2024-08-01T00:40:09+5:302024-08-01T00:40:22+5:30
बेकायदा बांधकाम करणाऱ्यांनी या कारवाईला विरोध करत पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

अनधिकृत बांधकाम कारवाई दरम्यान मनपा अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांना मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : वसई विरार मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही बेकायदा बांधकामांना आळा घालण्यात पालिका अपयशी ठरत आहे. त्यामुळे भूमाफियांचे फावले आहेत. बुधवारी मनपा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अजित मुठे हे त्यांच्या जमीनदोस्त पथकासह कामण-भिवंडी रोडवरील चिंचोटी, शिल्लोत्तर येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेले होते.
कारवाई सुरू असताना बेकायदा बांधकाम करणाऱ्यांनी या कारवाईला विरोध करत पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पालिकेने बेकायदा बांधकाम पाडण्यास सुरुवात करताच तेथे उपस्थित भूमाफियांनी अजित मुठे व त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर अजित मुठे आणि त्यांची टीम भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नायगाव पोलीस ठाण्यात गेली आहे.