मेट्रोची कामे, उड्डाणपूल आणि रस्ते दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी उपायुक्त विनय राठोड यांची माहिती
By जितेंद्र कालेकर | Published: November 9, 2023 09:13 PM2023-11-09T21:13:18+5:302023-11-09T21:15:02+5:30
पर्यायी मार्ग आणि वाहतूक मदतनिसांच्या मार्फतीने वाहतुकीचे नियमन
ठाणे: ठाणे शहरासह संपूर्ण ठाणे शहर आयुक्तालयात विविध ठिकाणी मेट्रोची कामे, नवीन उड्डाणपूल आणि जुन्या पुलांची दुरुस्ती तसेच रस्त्यावरील दुरुस्तीच्या कामांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये शहरात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्याकरिता काही ठिकाणी पर्यायी मार्ग काढले जाणार आहेत. तसेच काही ठिकाणी जादा बंदोबस्त आणि वाहतूक मदतनिसांच्या मदतीने वाहतूक नियंत्रण केले जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी गुरुवारी दिली.
ठाण्यातील कापूरबावडी नाका ते नळपाडा या मार्गावर सध्या मेट्रोचे आठ पिलर टाकण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. तसेच माजीवडा उड्डाणपूलावर मास्टीकच्या बिघाडामुळे उंचवटे आल्याने याठिकाणी रस्ते उखडून पुन्हा डांबराने दुरुस्ती केली जाणार आहे. दुरुस्तीचे हे काम माजीवडा पुलावर ठाणे ते घाेडबंदर आणि घाेडबंदर ते ठाणे अशा तीन किलोमीटरच्या रस्त्यावर होणार आहे. याशिवाय, कासारवडवली भागात नवीन उड्डाणपूलाचे काम सुरु आहे.
उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आदी उपनगरांमध्येही अशीच कामे सुरु आहेत. त्यामुळे या भागांमध्ये संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वाहतूक विभागाने ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागातील १८ युनिटच्या अधिकाऱ्यांमार्फत वाहतुकीचे नियमन करण्यात येत आहे. त्यासाठी ५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची कुमक तैनात केली आहे. तसेच काही ठिकाणी जादा वाहतूक मदतनीसांची नियुक्ती केली आहे. काही भागांमध्ये पर्यायी मार्ग दिले आहेत. काही ठिकाणी नो पार्किंग केले जाणार असून वाहतूक पोलिसांकडून त्यासाठी नियोजन आणि नियमन केले जात असल्याची महिती डॉ. राठोड यांनी दिली. यावेळी ठाणे शहर, मुंब्रा, भिवंडी, डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगर आदी ठिकाणी सुरु असलेल्या कामांची माहिती चित्रफितीद्वारे उपायुक्तांनी दिली.