रेमडेसिविरच्या काळ्याबाजारावर उपायुक्तांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:27+5:302021-04-13T04:38:27+5:30

ठाणे : सध्या ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असून, दोन दिवसांपूर्वी रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक झाली होती. ...

Deputy Commissioner's Watch on Remedesivir's Black Market | रेमडेसिविरच्या काळ्याबाजारावर उपायुक्तांचा वॉच

रेमडेसिविरच्या काळ्याबाजारावर उपायुक्तांचा वॉच

Next

ठाणे : सध्या ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असून, दोन दिवसांपूर्वी रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक झाली होती. यातील एकाने या इंजेक्शनचा साठा महापालिकेच्या रुग्णालयातून मिळविला असल्याची गंभीर बाब तपासात समोर आली आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेने रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा आणि वितरणासाठी उपायुक्त दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. यामुळे रेमडेसिविरच्या सुरू असलेल्या काळाबाजाराला चाप बसणार असून रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून ठाण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना ते आणण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे ते मिळविण्यासाठी नातेवाईकांची तारेवरची कसरत सुरू आहे. त्यातच शनिवारी ठाणे पोलिसांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली. यातील एक आरोपी हा महापालिकेच्या रुग्णालयातूनही इंजेक्शन मिळवित असल्याची गंभीर बाब समोर आली. त्यामुळे महापालिकेची यामध्ये चांगलीच बदनामी झाली आहे. या प्रकरणात अटक केलेला आतीफ अंजुम हा महापालिकेच्या कोरोना केंद्रामध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करीत असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. यामुळे यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे, याची माहिती आता घेतली जात आहे. यामुळे महापालिकेची पुन्हा एकदा बदनामी झाली असून यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानुसार आता महापालिकेने आता रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणी, पुरवठा आणि वितरणासाठी उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे प्राणवायूची मागणी, पुरवठा आणि वितरणाचीही जबाबदारी सोपविली आहे. यामुळे रेमडेसिविरचा किती साठा खरेदी झाला आणि त्याचा वापर किती झाला, याचा तपशील ठेवणे महापालिकेला शक्य होणार असून यामुळे काळाबाजार रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

Web Title: Deputy Commissioner's Watch on Remedesivir's Black Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.