उपमहापौरांची तक्रारदाराला ठार मारण्याची धमकी - जयेश वाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 12:51 AM2020-01-22T00:51:55+5:302020-01-22T00:51:58+5:30
कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या कारकिर्दीत टिटवाळ्यात बेकायदा बांधकामे वाढली. भोईर यांचे वास्तव्य असलेले घर व कार्यालय बेकायदा असल्याचा दावा युवा सेनेचे प्रदेश सहसचिव जयेश वाणी यांनी केला.
कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या कारकिर्दीत टिटवाळ्यात बेकायदा बांधकामे वाढली. भोईर यांचे वास्तव्य असलेले घर व कार्यालय बेकायदा असल्याचा दावा युवा सेनेचे प्रदेश सहसचिव जयेश वाणी यांनी केला. याबाबत त्या का मौन बाळगून आहेत, असेही वाणी म्हणाले. शिवसैनिक नरेश पाटील यांच्या जागेत अतिक्रमण करून भोईर यांनी उभारलेले कार्यालय वाचवण्यासाठी त्यांनी पाटील यांना ठार मारण्याची धमकी दिली होती, असा आरोपही वाणी यांनी केला.
बेकायदा बांधकामांची शिवसेना व महापौर विनीता राणे पाठराखण करीत असल्याचा आरोप उपमहापौर भोईर यांनी सोमवारी केला होता. त्यामुळे मंगळवारी शिवसेनेनी त्यांच्यावर पलटवार केला. वाणी यांनी महापालिका पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, टिटवाळ्यातून भोईर या नगरसेविका झाल्या आहेत. पाच वर्षांत त्यांच्या कार्यकाळात टिटवाळा परिसरात बेकायदा बांधकामे झाली आहेत. त्याला शिवसेना कशी जबाबदार असू शकते. त्यामुळे भोईर यांनी सोमवारी केलेल्या आरोपात तथ्य नाही. भोईर या बेकायदा घरात राहत असून त्यांनी दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करून घर बांधले आहे. त्यांच्या कार्यालयाची इमारत रस्त्याचे सामासिक अंतर सोडून पुढे आलेली आहे. त्यामुळे त्यांचे कार्यालय बेकायदा आहे, असे वाणी म्हणाले.
वाणी यांनी शिवसैनिक व टिटवाळ्यातील स्थानिक नरेश पाटील यांच्या जागेत भोईर यांनी अतिक्रमण केल्याची माहिती दिली. भोईर यांनी केलेल्या अतिक्रमणाविरोधात पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र भोईर यांनी भाजप आमदार व खासदारांकडून प्रशासनावर दबाव आणून तसेच पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप वाणी यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे गटनेते दशरथ घाडीगावकर यांनी उपमहापौरांनी राजीनामा दिला नसून केवळ राजीनाम्याचे नाट्य केले आहे, असा आरोप एका पत्राद्वारे केला आहे. बेकायदा बांधकामांविरोधात शिवसेनेने नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. त्यात कधीही पक्षभेद केलेला नाही. भोईर या दोनदा स्थायी समितीच्या सदस्य होत्या. बेकायदा बांधकामांच्या विरोधात त्यांनी आयुक्तांकडे किती वेळा तक्रारी केल्या. तत्कालीन भाजप मुख्यमंत्र्यांकडून का कारवाईचा आदेश आणला नाही. त्यामुळे त्यांचे वागणे हे उपमहापौरपदाला शोभणारे नाही. बेकायदा बांधकामे रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. त्याचे खापर त्यांनी शिवसेनेवर फोडू नये, असा सल्ला घाडीगावकर यांनी दिला.
‘माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नाही’
यासंदर्भात उपमहापौर भोईर म्हणाल्या की, बेकायदा बांधकामांच्या विरोधात मी वारंवार तक्रार केली आहे. त्याची दखल घेतली जात नाही. त्याला शिवसेना पाठिशी घालते हाच तर माझा आरोप आहे. कारवाई केली गेली असती तर मला आरोप करण्याची वेळच आली नसती.
मी राहत असलेले घर ग्रामपंचायतीच्या काळापासूनचे आहे. तसेच माझे कार्यालय हे अधिकृत इमारतीत आहे. त्यामुळे घर व कार्यालय बेकायदा असल्याच्या आरोपात तथ्य नाही.
मी कोणावरही दबाव आणला नाही. तसेच जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली नाही. उलटपक्षी बेकायदा बांधकाम करणाऱ्यांनी माझ्या दालनात घुसून मला अर्वाच्च्य भाषेत जीवे मारण्याची धमकी दिली होती.