मास्क घातल्यावर स्वच्छता न बाळगल्यास होऊ शकतात त्वचाविकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:41 AM2021-07-28T04:41:42+5:302021-07-28T04:41:42+5:30
अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर वाढल्याने त्वचाविकार होऊ लागले आहेत. मास्कमुळे त्वचेला खाज ...
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर वाढल्याने त्वचाविकार होऊ लागले आहेत. मास्कमुळे त्वचेला खाज सुटते, घाम येतो. त्यामुळे त्वचाविकाराच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यातच श्वास घ्यायलाही अनेकांना त्रास होत असून, त्या मुळेही शारीरिक व्याधी होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोविडकाळात मास्कशिवाय पर्याय नाही, हे जरी वास्तव असले तरी मास्क तसेच चेहऱ्यावर जेथे मास्क लावतो त्या भागाची वेळोवेळी स्वच्छता राखली जायला हवी. पण ती काळजी घेतली जात नसल्याने विशेषतः तरुणांमध्ये चेहऱ्यावर ॲलर्जी येणे, फंगल इन्फेक्शन होणे, पिंपल्स येणे अशा तक्रारी वाढत असल्याचे सांगण्यात आले. मुंबई परिसरात दमट हवामान असल्याने मास्क लावल्यावर आलेला घाम वेळीच न पुसला गेल्यास त्वचेचे विकार वाढतात, असे डॉक्टारांनी सांगितले.
-------------
मास्क आवश्यकच, पण असे करा रक्षण
- मास्क वेळोवेळी धुवावा
- एकदा घातलेला मास्क धुऊन फार तर तीन वेळा वापरा
- मास्क घातल्यावर घाम आल्यास दुसऱ्या रुमालाने पुसावा
- त्वचा कोरडी ठेवावी
- घाम साचू देऊ नये
- चेहरा स्वच्छ धुवावा
- सुती कापडाचा मास्क लावा, पण त्याची स्वच्छता बाळगा
--------------------
सॅनिटायझरपेक्षा साबण वापरा
सॅनिटायझर वारंवार वापरल्याने खाज सुटते आणि खाजविल्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी घरी असल्यावर वारंवार हात, चेहरा धुवावा. परंतु, त्यासाठी साबणाचा वापर करावा. बाहेर असताना सॅनिटायझर फार वापरल्यावर त्रास होऊ शकतो, म्हणून काळजी घ्यावी. मॉइश्चरायझर वापरून त्वचेची देखभाल करावी.
-------------
त्वचेला घाम येत असेल तर त्वचा कोरडी ठेवणारी क्रीम लावावी, कोरडी त्वचा असेल तर मग मॉइश्चरायझर वापरून शरीराची काळजी घ्यावी. परंतु, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानुसारच शरीराला उपयुक्त ठरतील अशी क्रीम, औषधे वापरावी. परस्पर निर्णय घेऊ नये, त्याने अपाय वाढू शकतो.
- त्वचाविकार तज्ज्ञ
------------
मास्कचा वापर केल्याने झाकल्या जाणाऱ्या चेहऱ्यावर घामामुळे पिंपल्स येणे, ॲलर्जी होणे, रॅश येणे अशा तक्रारी वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांत असे रुग्ण जास्त येत असल्याचे निदर्शनास येत आहे. डबल लेअर मास्क वापरणे गरजेचे असून ते वेळेवर धुवायला हवेत. तसेच मस्कचा वापर बघून एखादा मास्क किती वापरावा हे ठरवावे. त्वचाविकार झाल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, पण मास्क घालणे टाळू नये.
- डॉ. स्वाती गुरव, डोंबिवली
--------------