देसलेपाड्यात चिमुकल्याची अत्याचार करून हत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:07 AM2018-05-26T03:07:48+5:302018-05-26T03:07:48+5:30
मृतदेहावर जखमा : शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात
डोंबिवली : देसलेपाडा परिसरातून बेपत्ता असलेल्या सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह घराजवळील बांधकामाच्या ठिकाणी ड्रेनेजच्या टाकीत शुक्रवारी सकाळी सापडला. कल्याण-डोंबिवलीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयातील डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे समोर आल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र भोये यांनी सांगितले.
डोंबिवलीच्या देसलेपाडा परिसरातील चाळीत राहणारा मुलगा गुरूवारी सकाळी १० च्या सुमारास खेळताखेळता अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु त्याचा कोठेही थांग लागला नाही. अखेर याची माहिती मानपाडा पोलिसांना देण्यात आली. अग्नीशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी येऊन परिसरातील विहिरीमध्ये शोध घेतला. परंतु त्यांनाही शोध घेण्यात यश आले नाही. चाळीतील रहिवाशांची रात्रभर शोधमोहीम सुरू होती. शुक्रवारी सकाळी शोधकार्य सुरू असताना साडेदहाच्या दरम्यान नजीकच्या बांधकामाच्या ठिकाणी ड्रेनेजच्या टाकीतील पाण्यात मुलाचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आला. बांधकाम करणाऱ्या विकासकाच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू ओढवल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. त्या विकासकावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी लावून धरण्यात आली. संबंधितावर गुन्हा दाखल न केल्यास मानपाडा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला. परंतु डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत मृत्यू संशयास्पद असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. तेथील अहवालाच्या आधारे तपासाची दिशा ठरवण्यात येणार आहे.
मृत्यूबाबत साशंकता
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. तेव्हा डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. तसेच मृत मुलाच्या अंगावर जखमाही होत्या. त्यामुळेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रूग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली.
अहवालानंतर कारण स्पष्ट
याबाबत मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र भोये म्हणाले, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल. त्यानंतरच पुढील तपासाची दिशा ठरेल.
रूग्णवाहिका न दिल्याने ठिय्या
जे. जे. रूग्णायलात मृतदेह नेण्यासाठी रूग्णवाहिका न दिल्याने संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी रूक्मिणीबाई रूग्णालयाच्या प्रशासनाचा निषेध करीत आवारातच ठिय्या दिला. सुमारे अर्धा ते पाऊण तास हे आंदोलन सुरू होते. चालक उपलब्ध नसल्याने रूग्णवाहिका देता येत नसल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे करण्यात आले. तसेच आमच्या रूग्णवाहिका ठाण्याच्या पुढे जात नसल्याचेही सांगण्यात आल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली. अखेर खाजगी रूग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.