डोळखांबच्या हुंबचापाड्यातील महिलांची पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 02:04 AM2019-04-27T02:04:20+5:302019-04-27T02:04:29+5:30
मूलभूत सुविधांपासून वंचित : पिण्यासाठी गढूळ पाणी, आरोग्याची समस्या
- वसंत पानसरे
किन्हवली: धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांची ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. डोळखांब भागातील ढाढरे ग्रामपंचायत हद्दीतील हुंबाचापाडा या गावाची अवस्था भयानक असून गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. या गावात रस्ते, पाणी या जीवनावश्यक सुविधांअभावी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
तालुक्यातील डोंगरभागावर वसलेले जेमतेम १५० लोकवस्तीचे हुंबाचापाडा हे गाव. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव शासकीय लालफितीमुळे शापित जीवन जगत आहे. गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना अर्धा किमी पायपीट करावी लागते. अनेकदा तर पाण्यासाठी दगडगोट्यांमध्ये आपला जीव धोक्यात घालावा लागतो. पाण्यासाठीची ही ससेहोलपट हुंबाचापाड्याच्या नशिबी अनेक वर्षांपासून आहे.
शेती हे रोजगाराचे एकमेव साधन. पण, आता शेतीवर गुजराण होत नाही म्हणून अनेकजण मोलमजुरीसाठी अन्यत्र जातात. इथे येजा करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना आपल्या सामानाची नेआण स्वत:च करावी लागते. एवढेच नव्हे तर गावात जर कोणी आजारी पडले, तर रुग्णाला खांद्यावर उचलून ९०० मी. मुख्य रस्त्यावर आणून इतर वाहनांमधून दवाखाना गाठावा लागतो. रस्त्याअभावी हुंबाचापाडा गावाला या मरणयातना सोसाव्या लागत आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी होणारे आमचे हाल अनेक वर्षांपासून कोणाला समजलेच नाही. गढूळ पाणी प्यावे लागते. गावात आरोग्य, शिक्षण, रस्त्यांची गैरसोय आहे. शासन, लोकप्रतिनिधी आमच्या समस्या जाणूनच घेत नाहीत. फक्त मतांचे जोगवे मागण्यासाठी येतात.
बेलवली या गावातून आमची जुनी नळयोजना होती. तेव्हा पाण्याची एवढी टंचाई नव्हती. २००९ मध्ये आमची वेगळी पाइपलाइन मंजूर झाली. त्यावेळी विहीर मंजुरीसाठी प्रयत्नही केले होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या उदासीनपणामुळे नवीन विहीर न बांधता २००० मध्ये झालेल्या नादुरुस्त विहिरीवरूनच पाइपलाइन जोडली गेल्याने दोन वर्षांनंतर पाणी येणेच बंद झाले. त्यानंतर, २०१४ ला शासनस्तरावरून बेळवली-हुंबाचापाडा ही नळयोजना दुरु स्तीस काढली गेली आणि त्याला जोडलेली हुंबाचापाडा ही ९०० मी. पाइपलाइन कट करण्यात आल्याने आम्हाला टंचाई जाणवू लागली आहे.
- कमल भोईर, उपसरपंच, ग्रा.पं. ढाढरे
हुंबाचापाडा येथे पाण्याचा स्रोत नाही. बोअरवेलला पाणी कमी झाले असून तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही टँकरने पाणीपुरवठा करणार आहोत. परंतु, तांत्रिक अडचण अशी आहे की, टँकर जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
- एम. आव्हाड, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, शहापूर