मेट्रो स्थानकास गोडदेव नाव देण्यासाठी महापौर, आयुक्त, आमदार आदिंना ग्रामस्थांची निवेदने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 05:54 PM2017-12-22T17:54:51+5:302017-12-22T17:54:57+5:30
प्रस्तावित मेट्रोच्या भार्इंदर क्रिडा संकुल येथील स्थानकास गोडदेव गाव असे नाव देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी महापौर, उपमहापौर, आमदार तथा आयुक्यांना निवेदनं दिली असुन १५ दिवसात नावा बाबत निर्णय घ्यावा अन्यथा
मीरारोड - प्रस्तावित मेट्रोच्या भार्इंदर क्रिडा संकुल येथील स्थानकास गोडदेव गाव असे नाव देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी महापौर, उपमहापौर, आमदार तथा आयुक्यांना निवेदनं दिली असुन १५ दिवसात नावा बाबत निर्णय घ्यावा अन्यथा महापौर - आयुक्त दालनां बाहेर ठिय्या आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय .
मीरा भाईंदर शहरात मेट्रोच्या अद्याप थांगपत्ता नसला तरी मेट्रो स्थानकाच्या नामकरणावरुन वादंग निर्माण झालाय. एमएमआरडीएने शहरातील मेट्रो स्थानकांची नावं सुचवली असता त्याचा प्रस्ताव आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी महासभेत आणला होता. भाजपाचे रोहिदास पाटील यांनी ठराव मांडताना प्रशासनाने सुचवलेल्या क्रि डा संकुल स्थानका ऐवजी महाराणा प्रताप असे नांव दिले. भाजपाने तो बहुमताच्या बळावर मंजुर देखील केला. तर
शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी क्रिडा संकुल स्थानकास गोडदेव हे पुर्वापार असलेल्या गावाचे नाव देण्याचा मांडलेला ठराव देखील भाजपाने फटाळुन लावला.
या विरोधात गोडदेव गावातील ग्रामस्थांनी भाजपाचा निषेध व्यक्त करत गावातील विठ्ठल मंदिरात सभा घेतली. त्यात सभेत सर्वांना ग्रामस्थांचे निवेदन देण्याचे व १५ दिवसांची मुदत देण्याचे ठरले.
त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त डॉ. नरेश गीते तसेच आमदार नरेंद्र मेहता यांना भेटुन निवेदन दिले आहे. निवेदना मध्ये गोडदेव हे पुर्वापार वसलेले गाव असुन स्थानिक आगरी - कोळ्यांची संस्कृती व वस्ती आहे. गोड पाण्याच्या विहरी असल्याने शहरातील लोकांची तहान भागवण्याचे मोठे कार्य या गाावचे आहे. महसुली नोंदी सह विविध शासकिय दप्तरी देखील गोडदेव गावचा उल्लेख आहे.
महाराणा प्रताप यांचे नावास आमचा विरोध नाही. त्यांच्या बद्दल नेहमीच आदर आहे. परंतु त्यांचे नांव शहरातील अनेक जागांना दिले आहे. मात्र कुठल्याही स्थानकाचे नांव देताना स्थानिक गावाचा विचार होणे आवश्यक आहे. १५ दिवसात गोडदेव गाव असे नांव न दिल्यास पालिकेत ठिय्या आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय.
महापौर, उपमहापौर व आयुक्तांना निवेदन देताना नगरसेविका तारा घरत, स्रेहा पांडे, हरिश्चंद्र आमगावकर सह विठोबा देवालय ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, खजिनदार वासुदेव पाटील, रमेश घरत, भालचंद्र पाटील, हेमंत पाटील, सचीन घरत, मिलन पाटील, अजय म्हात्रे, अॅड. सुशांत पाटील, प्रशांत पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
तर ग्रामस्थांनी महापौर मेहता व आमदार मेहता यांची भेट घेतली असता त्यांच्या कडुन मेट्रो स्थानकास गोडदेव गाव असे नाव देण्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे एका ग्रामस्थाने सांगीतले. त्यामुळे या प्रश्नी ग्रामस्थ आता स्थानिक आमदार प्रताप सरनाईक सह खासदार राजन विचारे, पालकमंत्री एकनाथ शिंदे व नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्या ग्रामस्थाने सांगीतले.