देसले कुटुंबाची शासनाकडून परवड, पत्नीने दिला आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 03:44 AM2018-03-03T03:44:20+5:302018-03-03T03:44:20+5:30
तहसीलदाराच्या त्रासाला कंटाळून १० मे २०१७ रोजी मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथील शेतकरी अशोक शंकर देसले यांनी मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
मुरबाड : तहसीलदाराच्या त्रासाला कंटाळून १० मे २०१७ रोजी मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथील शेतकरी अशोक शंकर देसले यांनी मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेस वर्ष उलटले तरी यासाठी जबाबदार तत्कालीन तहसीलदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य देण्याचे मिळालेले आश्वासनही अद्याप पूर्ण झालेले नाही. हे अर्थसाहाय्य मिळावे आणि त्या तहसीलदारावर कारवाई व्हावी, यासाठी अशोक देसले यांची पत्नी सुनीता आठ महिन्यांपासून प्रयत्न करत आहे. मात्र, कोणतीही हालचाल करत नसल्याच्या निषेधार्थ त्या कुटुंबासह १० मे रोजी तहसील कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार आहेत.
तालुक्यातील शेलगाव येथील शंकर देसले यांची जमीन तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने त्यांच्या भावाच्या नावावर करून दिली होती. ही जमीन चुकीच्या पद्धतीने नावावर करून दिल्याची बाब अशोक देसले यांच्या निदर्शनास आल्याने झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी मुरबाड तहसीलदार कार्यालयात अर्ज दिला होता. या अर्जाची रीतसर चौकशी होऊन तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी दुरुस्तीचा अहवाल तत्कालीन तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांना दिला होता. परंतु, तहसीलदार म्हस्के-पाटील हे आदेश देण्यास चालढकल करत होते. नंतर, तर त्यांनी दोन लाखांची मागणी केल्याची माहिती अशोक देसले यांच्या पत्नीने दिली. हे पैसे देण्यासाठी १० मे २०१७ रोजी देसले मुरबाड येथे तहसील कार्यालयात गेले होते.
मात्र, काम होत नाही म्हणून त्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध होऊन घटनेस जबाबदार असलेले तत्कालीन तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्यावर फक्त बदलीची कारवाई केली. तसेच म्हस्के-पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे व देसले यांच्या पत्नीला मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य देण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले होते.
>अशोक देसले यांच्या पत्नीला मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रकरण पाठवले आहे.
- सचिन चौधर, तहसीलदार मुरबाड