पाऊस सुरू होण्यापूर्वीच तलावांमधील गाळ काढा; जिल्हाधिकारी शिनगारेंचे आदेश
By जितेंद्र कालेकर | Published: June 4, 2023 06:56 PM2023-06-04T18:56:34+5:302023-06-04T18:57:13+5:30
गाळमुक्त धरण योजनेच्या कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यातील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शनिवारी दिवसभर पाहणी केली. पाणी साठा वाढविण्यासाठी तलाव/पाझरतलाव आणि गावतलावातील शंभर टक्के गाळ काढण्याची कामे येत्या १५ दिवसांत पूर्ण करावीत. यासाठी आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर आदी मशिनरी वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी दिले.
गावांमधील तलावांमधील जलस्त्रोतांचे बळकटीकरण व्हावे, पाणी साठा वाढण्यासाठी जिल्ह्यात दहा गावांमधील तलावांमधील गाळ काढण्याची कामे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून सुरू आहेत. यासाठी भारतीय जैन संघटना, वसुंधरा मंडळाचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्यातील भिवंडी तालुक्यातील कोन गाव, केल्हे, शहापूर तालुक्यातील कसारा, मुरबाड तालुक्यातील पऱ्हे व शिरवली या गावांतील कामांची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच तेथील सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधून कामांची माहिती घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उप विभागीय अधिकारी अमित सानप, उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील, तहसीलदार अधिक पाटील आदी उपस्थित होते.
भिवंडीतील कोन गावातील गाव तलावाच्या कामांपासून पाहणी दौऱ्याची सुरूवात झाली. कृषि विभागाच्या सहकार्याने तलावाच्या शेजारी कन्व्हर्जन करून शेतीसाठी या तलावाच्या पाण्याचा वापर करा. तलावाच्या बांधावर बांबूची झाडे लावावीत, तसेच केलेल्या कामांचे डॉक्युमेंटेशन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. केल्हे गाव तलावातून पहिल्यांदाच गाळ काढण्यात येत असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. या गाव तलावाची सीमारेषा आखावी. मुरबाड तालुक्यातील पऱ्हे येथे आमदार किसन कथोरे, सरपंच सोमनाथ भोईर यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारीही दौऱ्याच्या वेळी उपस्थित होते. पऱ्हे गावतलावातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे गाळ काढण्याच्या कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या. शिरवली धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ आमदार किसन कथोरे आिण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला.
ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा-
जलस्त्रोतांचे बळकटीकरणासाठी तलावांमधील गाळ काढणे आवश्यक आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठा वाढेल. तलावातील गाळामुळे शेतात सुपिकता येईल. त्यामुळे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावी असून प्रशासनाने तलावांमधील गाळ काढण्याच्या कामाला आणखी गती द्यावी. ग्रामस्थांनी योजनेत सहभाग नोंदवून तलावातील गाळ आपल्या शेतात न्यावा. तसेच तलावातील गाळ पाऊस सुरू होण्यापूर्वी काढण्यासाठी श्रमदान करण्याचे आवाहनही शिनगारे केले.