गतिमंदांचे ‘क्षितिज’ विस्तारण्याचा ध्यास

By admin | Published: March 28, 2017 05:44 AM2017-03-28T05:44:29+5:302017-03-28T05:44:29+5:30

गतिमंद विद्यार्थ्यांना घडवण्याचे एक मोठे आव्हान डोंबिवलीतील क्षितिज शाळेने पेलले आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या

The desire to expand the 'skyline' of the swamps | गतिमंदांचे ‘क्षितिज’ विस्तारण्याचा ध्यास

गतिमंदांचे ‘क्षितिज’ विस्तारण्याचा ध्यास

Next

जान्हवी मोर्ये / डोंबिवली
गतिमंद विद्यार्थ्यांना घडवण्याचे एक मोठे आव्हान डोंबिवलीतील क्षितिज शाळेने पेलले आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गुढ्यांना बाजारात चांगली मागणी आहे. शाळेने घेतलेल्या मेहनतीच्या रूपाने गतिमंदांच्या पुनर्वसनाची गुढीच उभारली जात आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
क्षितिज शाळेत सध्या १०५ विद्यार्थी आहेत. त्यांना शिकवून त्यांचे समाजात पुनर्वसन करण्याचे एक आव्हान या शाळेने पेलले आहे. शाळेत पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, केअर ग्रुप, व्यावसायिक शिक्षणवर्ग भरवले जातात. एका वर्गात किमान १० गतिमंद मुले असतात. अशा ४० ते ५० विद्यार्थ्यांकडून गुढ्या तयार करून घेतल्या जातात. या गुढ्यांना डोंबिवलीबरोबरच ठाण्यातून मागणी आहे. काही राष्ट्रीयीकृत बँकांनीही या गुढ्या विकत घेण्यात स्वारस्य दाखवले आहे. गतिमंद मुलांकडून गुढी तयार करून घेण्यासाठी किमान दोन महिने आधीच आॅर्डर द्यावी लागते. या मुलांना गुढी उभारण्यासाठी किमान दीड महिना लागतो. यंदाच्या गुढीपाडव्याला त्यांनी दोनशेपेक्षा जास्त गुढ्या तयार केल्या आहेत. त्या विविध ठिकाणी उभारणार आहेत. हा आनंद त्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा जास्त आहे. याचे सगळ्यात जास्त समाधान त्यांच्या शिक्षकांना आहे. विद्यार्थी काठीला रंग लावतात. डोंबिवलीतील रेणुकामाता मंदिरात देवीला नवरात्रीनिमित्त आणि वर्षभरात वाहिले जाणारे चोळीचे खण, साड्या आदी साहित्य शाळेला दिले जाते. त्याचा वापर विद्यार्थी गुढीला जरीचे कापड म्हणून करतात. हार फुले व गडू लावून गुढी सजवली जाते. एक गुढी १०० ते २०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. आकारानुसार त्यांचे दर असतात.
गुढीव्यतिरिक्त या मुलांकडून गणपतीत गणेश सजावटीचे साहित्य, दिवाळीत आकाशकंदील, पणत्या, संक्रातीला तीळगूळ तयार करून घेतले जातात. वर्षभर ही मुले विविध उपक्रमांत दंग असतात. शाळेकडून त्यांना साहित्य पुरवले जाते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन करण्यावर अधिक भर दिला जातो. १५ विद्यार्थी शाळेबाहेर शाळेचा आधार न घेता अनेक वस्तू तयार करण्याचे काम यशस्वीरीत्या करतात. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जिल्हा व राज्यपातळीवर गौरवण्यात आले आहे.
गतिमंदांच्या शारीरिक व बौद्धिक मर्यादेवर मात करून त्यापलीकडील त्यांचे क्षितिज विस्तारण्यासाठी या सात जणींची धडपड अव्याहत सुरू आहे.

Web Title: The desire to expand the 'skyline' of the swamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.