आवाहन करूनही कुरव पक्ष्यांना टाकले जातेय कृत्रिम पदार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:31+5:302021-03-04T05:16:31+5:30
ठाणे : कुरव पक्ष्यांना कृत्रिम खाद्य खायला घालणे हे त्यांच्यासाठी अत्यंत घातक आहे. याविषयी रविवारी विशेष मोहीम हाती घेऊन ...
ठाणे : कुरव पक्ष्यांना कृत्रिम खाद्य खायला घालणे हे त्यांच्यासाठी अत्यंत घातक आहे. याविषयी रविवारी विशेष मोहीम हाती घेऊन ठाणेकरांमध्ये जनजागृती करून असे खाद्यपदार्थ न टाकण्याचे आवाहनदेखील केले. परंतु, तरीही दुसऱ्या दिवशीपासून कुरव पक्ष्यांना कृत्रिम पदार्थ खायला टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अशांवर दंडात्मक कारवाईची मागणी पर्यावरण संस्थांनी केली आहे.
पक्ष्यांचे खायला घालणे हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. आपल्या अशा अनावश्यक कृतीमुळे कुरव पक्ष्यांच्या स्थलांतरावर व राहण्या-खाण्याच्या सवयींवर विपरीत दूरगामी परिणाम संभवतो, याची नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे नागरिकांच्या माहितीसाठी रविवारी सकाळी मासुंदा तलाव येथे येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या सहभागी संस्था व मराठा जागृती मंच, ठाणे यांच्यातर्फे जनजागृती करण्यात आली.
पुण्यकर्माच्या अंधश्रद्धेतून स्थलांतरित पक्ष्यांना खाद्य घालण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. पर्यावरणीय संस्था लोकशिक्षणाच्या माध्यमातून जनजागरणाचे काम करीत आहेत. तलाव व आसपासच्या परिसरात प्रदूषण करणे रोगराईला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे वनविभाग व ठामपा यांनी संयुक्तरित्या पक्ष्यांना खाद्य टाकणे कसे चुकीचे आहे, याची माहिती देणारे प्रबोधनपरफलक ठाणे शहरात मोक्याच्या जागांवर लावावे तसेच मासुंदा तलाव येथे सीसीटीव्ही लावून कायदेभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. तरच या गैरप्रकारांवर संपूर्णतः आळा बसू शकेल, असे येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे समन्वयक रोहित जोशी यांनी सांगितले.
जनजागरण मोहिमेदरम्यान पक्ष्यांना खाद्य टाकण्यास आमच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना मज्जाव केल्यास त्यांच्याबरोबर खटके उडण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत. स्वयंसेवी संस्था म्हणून आमच्या मर्यादा आहेत. पक्ष्यांना व त्यांच्या अधिवासाला जाणीवपूर्वक धोका पोहोचविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली तरच अशा चुकीच्या गोष्टींना पायबंद बसेल. तरी कारवाईची जबाबदारी असलेल्या ठामपा व वनविभाग या प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, असे मराठा जागृती मंच, पानिपत, ठाणे विभागाचे सुधाकर पतंगराव म्हणाले.
-------------
फोटो मेलवर
-