पुरस्कारानंतरही ‘स्वच्छ भारत’चा भिवंडीत बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:16 AM2020-01-12T00:16:50+5:302020-01-12T00:17:20+5:30
भिवंडी महापालिकेने यावर्षीदेखील केंद्र सरकारच्या योजनेकरिता स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.
देशातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘स्वच्छ भारत अभियान’ मोहीम राबवली. या अभियानाला ठिकठिकाणांतून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही ठिकाणी हे अभियान फक्त दिखाव्यापुरते राहिले आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान बारगळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भिवंडी शहरात तर स्वच्छतेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी साचणारे कचऱ्याचे ढीग व शहर विकासाच्या नावाने शहरात सुरु असलेली भुयारी गटारे व काँक्रिट रस्त्यांच्या कामांमुळे शहरात धुळीने धुमाकूळ घातला आहे. रस्त्यांच्या नियोजनशून्य निर्माणामुळे शहरात वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
एकूणच या समस्यांमुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत भिवंडी महापालिकेला केंद्र शासनाचा ‘स्वच्छतेकडे वाटचाल करणारे शहर’ म्हणून २०१८ साली विशेष पुरस्कार मिळला होता. हा पुरस्कार मिळाल्यानंतर महापालिकेला घनकचरा निर्मूलनासाठी तसेच वाहनखरेदीसाठी कोट्यवधींचा निधी मिळाला होता. मात्र हा निधी नेमका कुठे वापरण्यात आला, असा सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहेत. कारण पुरस्कार मिळाल्यापासून ते आजपर्यंत भिवंडीतील कचºयाची समस्या मार्गी लावण्यासाठी भिवंडी मनपा प्रशासनास आजही यश आलेले नाही.
भिवंडी महापालिकेने यावर्षीदेखील केंद्र सरकारच्या योजनेकरिता स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरु वात केली आहे. मात्र, सध्या शहराकडे पाहिलं तर स्वच्छ भारत अभियान नेमके कुठे आणि कशा पद्धतीने सुरु आहे, असा प्रश्न पडतो. २०१८ साली शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या भिंतींवर मनपामार्फत स्वच्छतेचे संदेश देणारी सुंदर चित्रे रेखाटण्यात आली होती. काही ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन भिंतींवर विद्यार्थ्यांनीही सुंदर चित्रं रेखाटली होती. मात्र स्वच्छता अभियान संपले, महापालिकेला पुरस्कार मिळाल्यानंतर या सुंदर चित्रांच्या भिंतींकडे महापालिका प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे या भितींवर धूळमाती साचून या भिंती पुन्हा अस्वच्छ झाल्या आहेत. सध्या स्वच्छता अभियान सुरु झाल्याने या भिंतींवर काढलेल्या जुन्याच चित्रांना नव्याने रंगविण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. शौचालयांची दुरु स्ती, कचराकुंडीमुक्त शहर, हगणदारीमुक्त शहर, डम्पिंग ग्राउंडवर औषधफवारणी अशा विविध मोहिमा महापालिका प्रशासनाने सध्या हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर रात्री जादा सफाई कामगारांची नेमणूक करून रात्री शहर स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र ही मोहीम फक्त दिखाव्यासाठीच आहे, याचा अंदाज भिवंडीकरांना आता आला आहे. ही मोहीम फक्त स्वच्छता अभियानापुरतीच असते, याची प्रचीती देशात इतर कुठे आली असेल किंवा नसेलही मात्र भिवंडीकरांना आली आहे. केवळ पुरस्कारासाठी हा अट्टहास आहे, अशी समज भिवंडीतील नागरिकांची झाली आहे. भिवंडीत मुख्य नाक्यांवर व गर्दीच्या ठिकाणी प्रशस्त व स्वच्छ शौचालये व मुताºया नाहीत ही एक मोठी खेदाची बाब आहे. त्यामुळे भिवंडीकर नागरिक महापालिकेच्या या स्वच्छता अभियानाला यावर्षी अपेक्षित प्रतिसाद देतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने ‘स्वच्छ भिवंडी, सुंदर भिवंडी’ ही स्थानिकांची गरज आहे. मात्र भिवंडी महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा स्वच्छतेचा मूलभूत अधिकारच हिरावून घेतला आहे. त्यामुळे नागरिक मनपा प्रशासनाच्या स्वच्छतेबाबतच्या उदासीन धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.