कोरोनाबाधित होऊनही पाटील यांनी दिला इतरांना आधार; लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:30 PM2021-04-29T23:30:12+5:302021-04-29T23:30:20+5:30

लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांकडून कौतुक

Despite being coroned, Patil gave support to others | कोरोनाबाधित होऊनही पाटील यांनी दिला इतरांना आधार; लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांकडून कौतुक

कोरोनाबाधित होऊनही पाटील यांनी दिला इतरांना आधार; लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांकडून कौतुक

Next

अजित मांडके

ठाणे : कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांचे मानसिक स्वास्थ ढासळलेले असते. त्यांना मानसिक आधार देण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून डॉ. प्रमोद पाटील आणि त्यांची टीम करीत आहे. हे काम करीत असतानाच त्यांनादेखील कोरोनाची लागण झाली. त्यानंतर उपचार घेत असतानाही त्यांनी पोस्टकोविड सेंटरची काळजी घेतली. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांचे जोमात स्वागतही करण्यात आले. याच पोस्टकोविड सेंटरमध्ये मन परिवर्तनाबरोबरच लसीकरणाचेही काम सुरू आहे. हे काम करीत असताना येणाऱ्या प्रत्येकाला लस कशी मिळेल यासाठी त्यांची धडपड दिसून येत आहे.

ठामपाने सप्टेंबर २०२० मध्ये माजिवडा येथे पोस्टकोविड सेंटरची उभारणी केली. या सेंटरद्वारे कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना मानसिक आधार दिला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत येथे ६ हजार ७०० हून अधिक नागरिकांचे मनपरिवर्तन करण्याचे काम  पाटील आणि त्यांची १५ जणांची टीम करीत आहे. येथे येणाऱ्या नागरिकांचे आधी मनपरिवर्तन करणे, त्याला कोरोनातून बाहेर कसे काढता येईल यासाठी प्रयत्न करणे, योगा, आहाराविषयी मार्गदर्शन, फिजोओथेरपीच्या माध्यमातून उपचार आणि त्यांना मानसिक खच्चीकरणातून मुक्त करणे अशा पद्धतीने काम येथे सुरू आहे.

फेब्रुवारीपासून येथे टोकन देऊन लसीकरणही केले जात आहे. गर्दी असतानाही येणाऱ्या प्रत्येकाशी प्रेमाने बोलणे यामुळे नागरिक उशीर झाला तरी येथून हलत नाहीत. याच धावपळीत पाटील यांना कोरोनाची लागण झाली; परंतु लसीचे दोन डोस घेतल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागले नाही. विलगीकरणात असतानाही पोस्टकोविडमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची माहिती घेत होते. त्यामुळेच कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांचे तितक्याच दणक्यात सहकारी कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनीही स्वागत केले. 

सर्वसामान्य नागरिकाने केलेले कौतुक त्यांच्याच शब्दांत

मी माजिवडा येथील पोस्टकोविड सेंटर या लसीकरण केंद्रात लस घ्यायला गेलो असताना डॉ. प्रमोद पाटील, जे त्या विभागाचे मुख्य आहेत, ते जातीने लक्ष घालून माझ्यासह अनेक लोकांना प्रेमाने विचारपूस करीत होते. ते मला अतिशय कौतुकास्पद वाटलं. कामाचा ताण असतानाही या डॉक्टरच्या चेहऱ्यावर कायम हास्यच होतं.      - सर्वसामान्य नागरिक

कोरोना झाल्यानंतर तीन किलो वजन कमी झाले; परंतु लसीकरण झाल्याने माझा सिटीस्कॅन स्कोअर झिरो आला होता. कोरोनाचा प्रभाव कमी करायचा असेल तर लसीकरण हे महत्त्वाचे आहे. आपले काम हे अत्यावश्यक सेवेत असल्याने ते प्रामाणिकपणे करण्याची संधी मिळाली, यासाठी मी महापालिकेचे आभार मानतो. त्यातही नागरिकांकडून मिळणाऱ्या कौतुकाच्या थापेमुळे काम करण्यास आणखी उत्साह येत आहे.
    - डॉ. प्रमोद पाटील, पोस्टकोविड सेंटर प्रमुख

 

Web Title: Despite being coroned, Patil gave support to others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे