ऑनलाईन शाळा असूनही फी मात्र १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:08+5:302021-06-23T04:26:08+5:30
स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ऑनलाईन शाळांचा निर्णय योग्य आहे. गेल्या वर्षानंतर यंदाही ...
स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ऑनलाईन शाळांचा निर्णय योग्य आहे. गेल्या वर्षानंतर यंदाही कोरोनामुळे शाळा ऑनलाईनच सुरू झालेल्या आहेत. मात्र, तरीही बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांकडून नियमित शाळेनुसार १०० टक्के फी वसूल केली आहे. विद्यार्थी शाळेच्या कोणत्याही साधनांचा उपभोग घेणार नसूनही त्यांच्याकडून पूर्ण फी आकारल्याने पालक वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे.
ठाणे जिल्ह्यात खासगी, अनुदानित, विनाअनुदानित अशा मिळून एकूण १६२० शाळा आहेत. जिल्ह्यात अनुदानित ४५१, विनाअनुदानित ११६, अंशत: अनुदानित ७३, सेल्फ फायनान्स ८५१, तर अनरेक्ग्नाइज २६ शाळा आहेत. तर इतर १०३ शाळा अशा मिळून १६२० शाळा आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या सर्वच शाळा या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. इयत्तेनुसार आणि त्यांच्या अभ्यासानुसार शिक्षक दररोज काही तास ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेतात. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तके दिली. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेच्या इतर कोणत्याही सुविधेचा फायदा होत नाही की शाळेत वर्गही भरत नाही, तरी कसली फी घेतात, असा प्रश्न पालक उपस्थित करतात.
-------------
शाळा तर बंद आहे. ऑनलाईन क्लासच होतात. मुलं काय शाळेत जात नाहीत. शाळेचे वर्ग, कॉम्प्युटर क्लास, लायब्ररी, स्पोर्टस, या गोष्टी वापरल्या जात नाहीत, तर त्याचे चार्जेस तरी कमी करावेत. मात्र, शाळा हल्ली सरसकट फी घेत आहेत. हा आम्हा पालकांना भुर्दंड आहे.
- अनेय मेतकुटे, पालक
----------------
आधीच लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड अनेकांवर पडली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण महत्त्वाचे आहेच; पण तेही काही तासांपुरते असते. आणि एवढेच वर्ग होतात. मग यासाठी पूर्ण फी का आकारली जाते. शाळांनी फीमध्ये सगळ्यांना सवलत दिली पाहिजे.
राधिका दवणे, पालक
------------
---------------
आमची शाळा तर सध्या ७० टक्के फी घेते आहे. मात्र, इतर ज्या शाळा पूर्ण फी घेत असतील, त्यांनी शाळा ऑफलाईन सुरू होत नाही तोपर्यंत इतर विविध शुल्क जी आकारली जातात, ती कमी करायला हरकत नाही. त्यातही आपल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गेल्यावर्षी सुरुवातीला फी न भरण्याचे पालकांना आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर वर्षभरात त्यांनी त्याबाबत स्पष्ट खुलासा केला नाही. अनुदानित वगळता इतर सर्व शाळा चालविताना संस्थाचालकांना कसरत करावी लागते आहे. शाळेचा मेंटेनन्स, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार, लाईट बिल यातून सुटका नाहीच. या कोविडच्या काळात स्वत:कडचे पैसे पदरमोड करून शाळा चालविणे परवडत नसल्याने काही संस्थाचालकांनी शाळा बंद केल्या आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या फी बाबत काही गाईडलाईन ठरवून द्याव्या, तेच उचित ठरेल, असे मत ठाण्यातील काही नामांकित शाळेच्या संस्थाचालकांनी व्यक्त केले.