पाच टोलनाके असूनही रस्त्यांची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:13 PM2019-11-17T23:13:22+5:302019-11-17T23:13:26+5:30
नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहून नका अन्यथा एक दिवस नागरिक पेटून उठल्याशिवाय राहणार नाही याची नोंद प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी घ्यावी.
नागरिक प्रामाणिकपणे कर भरतात. हा पैसा विकासकामांसाठी वापरला जातो. जर नागरिकांच्या पैशांचा उपयोग करत असाल तर त्यांना चांगली सेवाही देता आलीच पाहिजे. मात्र आज प्रशासन नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहून नका अन्यथा एक दिवस नागरिक पेटून उठल्याशिवाय राहणार नाही याची नोंद प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी घ्यावी.
भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांचा विचार केला तर या रस्त्यांची चाळण झाली आहे. एकाच तालुक्यात पाच टोल नाके असलेला भिवंडी तालुका जिल्ह्यात एकमेव असावा. पाच टोल नाके असूनही खड्ड्यांचे साम्राज्य व वाहतूककोंडीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गांवर नेहमीच अपघात होतात. प्रवाशांबरोबरच स्थानिकांनाही आपला जीव मुठीत धरून या रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो. मात्र या टोल कंपन्यांवर वचक व देखरेख असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. इतर कुठल्याही ठिकाणाहून भिवंडीत यायचे असेल तर टोल द्यावाच लागेल अशी परिस्थिती आहे.
ठाणे, मुंबईतून कशेळीमार्गे भिवंडीत यायचे झाले तर या मार्गावर कशेळी येथे टोलनाका आहे. नाशिकहून भिवंडीत दाखल व्हायचे असेल तर पडघा येथे टोलनाका आहे . वसईमार्गे भिवंडीत यायचे झाले तर चिंचोटी अंजूरफाटा या मार्गावर मालोडी येथे टोलनाका आहे. वाडा येथून भिवंडीत यायचे असेल तर भिवंडी- वाडा मार्गावर कवाड येथे टोल नाका आहे. भिवंडी- वाडा मार्गावर अपघात झाल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने नुकताच या टोलकंपनी विरोधात नागरिकांनी आक्र मक आंदोलन करून सध्या हा टोेल नका बंद केला आहे . तर कल्याणमधून भिवंडीत याचे झाले तर कोनगाव टोल नाका आहे . विशेष म्हणजे या सर्व टोल नाक्यांवर अवजड वाहनांची नेहमीच ये-जा असल्याने पाचही टोल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असतो. मात्र प्रचंड आर्थिक फायदा होऊनही या टोल कंपन्यांचे रस्त्याच्या व्यवस्थापनाकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे चुकवताना अपघात झाल्याच्या अनेक घटना या रस्त्यांवर नेहमीच घडल्या आहेत.
खड्डे चुकवताना अपघात होऊन मृत्यू झालेल्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक संसार व कुटुंब उध्वस्त झाली आहेत. मात्र या रस्त्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे.
भिवंडीतील सर्वच टोलच्या रस्त्यांचा विचार केला तर सध्या या सर्वच टोल रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. एवढेच नव्हे तर भिवंडी महापालिकेच्या रस्त्यांचीही चाळण झाली आहे .शहरातील एकही रस्ता सध्या सुस्थितीत नाही. त्यामुळे या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे असे चित्र सध्या शहरात आहे.
कशेळी - अंजूरफाटा, चिंचोटी - अंजूरफाटा, भिवंडी - वाडा , भिवंडी - कल्याण , भिवंडी - नाशिक या सर्वच महामार्गाची सध्या दुरवस्था झाली आहे. चिंचोटी - अंजूरफाटा ते माणकोली या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावर असलेल्या खारबाव येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेत टोल कंपनीने रस्त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष देत रस्त्याची थातूरमातूर दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. आता या सर्वच रस्त्यांवर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
महापालिका हद्दीतील शहरांचा विचार केला तर भिवंडीत महापालिका अस्तित्वात आहे यावर सामान्य माणसांचा विश्वासच बसणार नाही अशी परिस्थिती शहरातील रस्त्यांची झाली आहे. शहरातील दर्गाह नाका, शिवाजी चौक, अंजूरफाटा, नारपोली, धामणकर नाका, कल्याण नाका, शांतीनगर, गैबीनागर, नवी वस्ती, एसटी स्टॅन्ड, भिवंडी कोर्ट व पालिका कार्यालया समोरच्या रस्त्याची तर अक्षरश: दुरावस्था झाली आहे. भिवंडी शहरातील मुख्य बाजार असलेल्या मंगल बाजार चौकात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे तर व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धूळ थेट दुकानांमध्ये येत असल्याने दुकानदार त्रस्त झाले आहेत. अनेक दुकानदार हा त्रास कमी व्हावा म्हणून आपापल्या दुकानासमोर पाणी मारून वेळ मारून नेतात.
रस्ते दुरूस्तीवर कोट्यावधींचा खर्च
शहरातील खड्डेमय रस्त्याने अनेकांचे बळी घेतल्यावर महापालिकेने रस्ता दुरूस्ती व डांबरीकरण सुरू केले. रस्ते चकाचक करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले असून रस्त्या दुरूस्तीवर किती कोटींचा खर्च झाला याची नोंद पालिकेच्या बांधकाम विभागाकडे नसल्याचे उघड झाले आहे. उल्हासनगरातील रस्त्याची दुरूस्ती व खड्डे भरण्याचे काम पावसाळयापूर्वी न केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती. खड्डेमय रस्त्याने अनेकांचे बळी घेतल्यावर व सर्वपक्षीय नेत्यांनी अांदोलनाचा इशारा दिल्यावर दुरूस्ती व खड्डे भरण्याचे काम महापालिकेने सुरू केले. पावसाळयात माती, दगड, रेतीमधून तात्पुरते खड्डे भरण्याचे काम केले. तर त्यानंतर कोल्ड व हॉट पद्धतीने रस्ता दुरूस्तीचा प्रयोग महापालिकेने राबविला. मात्र दोन्ही प्रयोग फसल्याची ओरड सुरू झाली. त्यानंतर दोन कोटींच्या निधीतून प्रत्येक प्रभागातील चार रस्त्यांचे डांबरीकरण व दुरूस्तीचे काम सुरू केले असून हा निधी कमी पडत असल्याची ओरड स्थायी समितीमध्ये झाली. महापालिकेने वाढीव निधीतून रस्त्यांचे डांबरीकरण व दुरूस्तीचे काम सुरू केले असून शहरातील रस्ते चकाचक दिसतील अशी प्रतिक्रीया स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी दिली. अर्ध्याहून अधिक रस्त्यांचे डांबरीकरण व दुरूस्ती झाली आहे त्यांची दुरूस्ती लवकरच हाती घेतली जाणार आहे.
शहापूर तालुक्यातील अनेक महामार्ग ठेवले खोदून
शहापूर तालुका तसा मुंबईपासून अगदी १०० किलोमीटर अंतरावर असलेला तालुका आणि याच मुंबईला पाणीपुरवठा करणारा अशी या तालुक्याची ओळख असताना आता हाच तालुका अनेक राज्यमार्गांचे केंद्रबिंदू बनला आहे. याच तालुक्यातून कधी नव्हे तो मुंबई- नाशिक- आग्रा महामार्ग गेला. या महामार्गामुळे नाशिक- मुंबई अगदी जवळ आल्याने अनेक प्रकारचा फायदा झाला. यामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना मुंबईची महत्वाची बाजारपेठ मिळाली. एकंदरीत आग्रा मार्ग जोडल्याने मुंबई- नाशिक- पुणे हा मोठा फेरा ही कमी झाला. पण पावसाळ््यात रस्त्यांची दुरवस्था चालकांसाठी डोकेदुखी ठरते.
आज याच तालुक्यातून शहापूर- शेणवा हा राज्य मार्ग तर पुढे किन्हवली सरळगाव हा प्रमुख जिल्हा मार्ग तयार करण्यात येत आहे. तर दुसरा शहापूर- सरळगाव- माळशेज घाट तर शहापूर- लोेनाड- मुरबाड थेट कर्जतला जोडणाºया राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील वर्षांपासूनच सुरू झाले आहे. आजही हे काम कुठेही पूर्ण झाले नाही तर यामध्ये आणखी भर घालणारा आणखी एक मार्ग म्हणजे शहापूर- डोळखांब- कसारा हा राज्यमार्ग तयार होत असून त्याचेही काम सुरू झाले असतानाच आता शहापूर- पिवळी- वाडा या प्रमुख जिल्हा मार्गाची आता तयारी सुरू आहे. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे.
तालुक्यात अनेक महामार्ग मग ते राज्य असोत वा राज्य महामार्ग असोत हे आजमितीला अनेक ठिकाणी खोदून ठेवले आहेत. आता अधिकच्या महामार्गाचे काम जोमाने सुरू असल्याने तालुक्यातील हिरवीगार संपदाही त्यामुळे नामशेष होत आहे.आज तयार झालेले वा पूर्णत्वास आलेले वा रु ंदीकरण करण्यात येत असलेल्या सर्वच महामार्गांसाठी केलेली वृक्षांची तोड पाहाता त्या बदल्यात कुठेही वृक्ष लागवड केली नाही. आज तालुक्याच्या चारही दिशांबरोबरच अंतर्गत भागातही महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र प्रदूषणाचा विचार केला तर मात्र शहापूरची अवस्था दिल्लीसारखी होऊ नये म्हणजे झाले.
नव्या गृहप्रकल्पांकडे जाणारे रस्ते अक्षरश: दगडमातीचे
अंबरनाथ : शहर झपाट्याने वाढत असताना या शहरापासून काही अंतरावर नव्याने वाढलेल्या वस्तीकडे अंबरनाथ पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या भागात आजही रस्त्यांची अवस्था बिकट आहे. डांबर तर सोडाच या ठिकाणी दगड टाकून रस्ता तयारही केलेला नाही. अनेक नव्या गृह प्रकल्पामधील घरांची विक्री होऊन आज रहिवासी राहण्यासाठी आले आहे. मात्र या नागरिकांना आजही रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अंबरनाथ पालिकेने सहा वर्षात काँक्रिट रस्त्यांचे जाळे तयार करण्याचे प्रयत्न केले आहे. मात्र असे असले तरी सर्वच रस्ते काँक्रिटचे करता आलेले नाही. ज्या राजकीय पुढाऱ्यांची ताकद जास्त त्यांच्या प्रभागातील प्रत्येक गल्लीही काँक्रिटची झाली आहे. तर राजकारणापासून काही प्रमाणात अलिप्त असलेल्या नगरसेवकांच्या वाट्याला पाच वर्षात एखाद काँक्रिटचा रस्ताच वाट्याला आला आहे. त्यामुळे राजकीय ताकदीवरच शहरातील रस्ते निर्मिती होताना दिसत आहे.
शहरात नेमकी काँक्रिट रस्त्यांची गरज कुठे आहे हे अद्याप शोधण्यात आलेले नाही. नगरसेवकांच्या इच्छाशक्तीप्रमाणे काँक्रिटच्या रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. शहरातील नवरेनगर परिसरात नव्याने निर्माण झालेल्या वसाहतीमध्ये आजही काँक्रिट रस्ता तर सोडाच साधे डांबरही पडलेले नाही. विश्वजित मेडोज, नवरे पार्क परिसर या भागात आजही रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. नवीन अंबरनाथ याच भागात वाढत असतानाही त्या भागातील रस्त्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. हीच अवस्था बुवापाडा भागातील रस्त्यांची झाली आहे. बी केबिन रोड परिसरातही काही रस्त्यांची अवस्था ही बिकट झाली आहे. सूर्याेदय सोसायटी परिसरातही अनेक रस्त्यांचे अद्याप काँक्रिटीकरण झालेले नाही. तर काही रस्ते आजही खड्ड्यात आहेत. अनेक रस्त्यांवर काँक्रिटीकरण केले आहे. मात्र अतिक्रमण न काढल्याने रस्त्यांचे रूंदीकरण रखडले आहे.
बदलापूरमध्ये दुरूस्तीकडे दुर्लक्ष
बदलापूर : बदलापूर शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र शहरातील टोेकावर असलेल्या वस्तींमध्ये आजही रस्त्यांची अवस्था बिकट आहे. या भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. बदलापूर शहरात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. मात्र शहरात आजही काही रस्ते असे आहेत की त्यांच्या दुरवस्थेत अद्याप सुुधारणा झालेली नाही. शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते दुरूस्त झाले असले तरी अनेक ठिकाणी डांबरी रस्ते दुरूस्त केले जात नाही. त्या रस्त्यांची अवस्था जैसे थे च राहिली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यावर चिखलोली गावाजवळील रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून खड्डयात गेला आहे. त्या ठिकाणचे खड्डे बुजविण्यासाठी साजामिक संस्था पुढे येतात, मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्षच करते. शिरगाव परिसरात आजही काही रस्त्यांवर डांबरही पडलेले नाही. तर काही रस्त्यांचे डांबरीकरण निकृष्ट झाल्याने ते रस्ते त्रासदायक झाले आहेत. नव्याने वाढणाºया वस्तीकडे जाणारे रस्ते आजही कच्चे आहेत. सोबत शहरातून जाणारा बारवी डॅम रोड हा देखील अनेक ठिकाणी खचला आहे. एरंजाड, वालिवली भागात अनेक ठिकाणी रस्ता खचलेला असतानाही त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही.