२००५ च्या पुरानंतरही बदलापुरात उल्हास नदीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:06 AM2019-07-26T00:06:47+5:302019-07-26T00:07:23+5:30
पालिकेने घेतला नाही बोध : नदीपात्राजवळ सुरू आहेत विकासकामे, भविष्यात होऊ शकतो मोठा धोका
पंकज पाटील
बदलापूर : २६ जुलै २००५ रोजीचा महापूर आणि त्यामुळे असह्य यातना भोगलेल्या बदलापूरकरांच्या नजरेतून येथील परिस्थितीवर दृष्टिक्षेप टाकल्यास या शहराने महापुरातून कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसते. महापुरात ज्या उल्हास नदीने रौद्ररूप दाखविले होते, त्या नदीची कोंडी करण्यात बदलापूर आजही कमी पडलेले नाही. पूर नियंत्रणरेषेला न जुमानता नदीपात्राजवळ विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात २००५ च्या पुराची पुनरावृत्ती होऊन बदलापुरात हाहाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी ही महत्त्वाची जीवनवाहिनी झाली आहे. या नदीचे पावित्र्य जपण्यात आणि तिचे संवर्धन करण्यात पालिका प्रशासन कमी पडलेले आहे. उल्हास नदीवर उभारण्यात आलेला बॅरेज डॅम २६ जुलै २००५ च्या महापुरात फुटल्याने बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. बदलापूर स्टेशन परिसरातच १० ते १५ फूट पाणी साचले होते. नदी आणि परिसरातील संपूर्ण भाग हा पाण्याखाली आला होता. रमेशवाडी भागात तर इमारतींच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसानदेखील झाले. संपूर्ण बदलापूर गाव तब्बल पाच दिवस पाण्याखाली होते. बदलापूरकरांनी घरदार सोडून कसाबसा आपला जीव वाचविला. आजही त्या कटू आठवणी बदलापूरकरांच्या मनात घर करून आहेत. महापुरात बदलापूर किती पाण्यात होते, याची कल्पना सर्वांनाच आहे. २००५ मध्ये नुकतीच बदलापूरच्या विकासाची कामे सुरू झाली होती. त्या काळात शहरात नव्याने गृह प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले होते. पुराच्या काळात बदलापुरात मोजक्याच इमारती होत्या. मात्र, आज संपूर्ण बदलापूर शहर इमारतींनी भरले आहे. २००५च्या लोकसंख्येच्या तुलनेत आज बदलापूरची लोकसंख्या अडीच पट वाढली आहे. असे असले तरी बदलापूर पालिका वा शासनाने भविष्यातील हानीचा कोणताच विचार केलेला दिसत नाही. उल्हास नदीपात्रातील पूर नियंत्रणरेषेलाच धाब्यावर बसवण्याचे काम केले आहे. अनेक गृह प्रकल्प हे नदीपात्राजवळच उभारले आहेत. बॅरेज धरणाच्या पात्राला लागूनच बंगलो स्कीम राबवण्यात आली आहे. ज्या परिसरात १५ फुटांपेक्षा जास्त पाणी होते, त्या ठिकाणी बंगले तयार करून त्यांची विक्री केलेली आहे. हाच प्रकार आता नव्याने सुरू झाला आहे. उल्हास नदीवरील बदलापूर गावाकडील पुलापासून वालिवली गावापर्यंतच्या नदीपात्रात अनेक गृह प्रकल्पांची कामे सुरू आहेत. शासनाने नदीपात्रातील गृह प्रकल्पांबाबतचे काही नियम शिथिल केल्याने काही इमारती या थेट नदीपात्रात आल्यात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महापुराच्यावेळी नव्याने विकसित होणाºया वालिवली भागातील मुख्य उतरणीपर्यंत पाणी साचले होते. मात्र, ज्या भागात पाणी साचले होते, त्याच भागात आता खाजगी शाळा आणि गृह प्रकल्प उभारण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, पाणी वाहून नेणारे नालेदेखील अरुंद करून ठेवले आहेत.
नफेखोरीसाठी तळमजल्यावर घरनिर्मिती
२००५ च्या महापुरामध्ये ज्या भागात १५ फूट पाणी साचले होते, त्या ठिकाणी इमारतींना परवानगी देताना चक्क तळमजल्यावरही घरांची निर्मिती केली आहे. नदीपात्राच्या परिसरात इमारतींची उभारणी करताना, त्या ठिकाणी इमारतीमधील पहिला मजला हा उंचावर असणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता नफेखोरीसाठी तळमजल्यावर घरनिर्मिती केली आहे.
हेंद्रेपाडा, मांजर्ली, वालिवली, बदलापूर गाव परिसरास पुराचा धोका असतानाही, विकास नियमावली धाब्यावर बसविण्यात आली आहे. पूर नियंत्रणरेषा नेमकी आहे कोठे, हेदेखील निश्चित करण्यात आलेले नाही. काही व्यावसायिकांनी नदीपात्राला लागूनच घरांची निर्मिती केली आहे.