उत्पादन चांगले येऊनही शेतकऱ्याच्या हाती राहिली फक्त केळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:15 AM2021-04-23T01:15:52+5:302021-04-23T01:16:02+5:30
लॉकडाऊनचा फटका : बाजारपेठा बंद, कंपन्यांनी फिरवली पाठ, गेल्यावर्षी नोकरी गेल्याने तो वळला शेतीकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हवली : डोळखांब परिसरातील गणेश उमवणे या युवा शेतकऱ्याने आजोबा पर्वताच्या पायथ्याशी तांत्रिक शेती करत केळीची लागवड केली आणि उत्पादनही चांगले आले. चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागल्याने बाजारपेठा बंद व कंपन्यांनी पाठ फिरविल्याने केळीची विक्री होऊ शकली नसल्यामुळे शेतकऱ्याच्या हातात केळीच शिल्लक राहिली आहेत.
गणेश उमवणे हा युवक वाहनचालक म्हणून ऐरोली येथे कामाला होता. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे नोकरी गेली. घरात दहा माणसांचे कुटुंब. त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने आपल्या भावाला सोबत घेऊन वालशेत या गावात शेणखत आणून जमीन मशागत केली. एक एकर जागेत कोल्हापूरहून जी-९ जातीच्या सुमारे १२०० रोपांची लागवड केली. त्यासाठी त्याने बोअरवेल करून ठिबक सिंचनाची व्यवस्थाही केली.
दहा महिन्यांनी केळी पीक तोडणीला आले. केळीचा एक धड साधारण ३५ किलो असून हजार झाडांचे ३५ प्रमाणे ३५ हजार किलो केळी निघाली. त्यातून चार लाख उत्पन्न अपेक्षित होते व त्यामध्ये खत, पाणी, औषधे व मजुरी खर्च वजा जाता निव्वळ तीन लाख रुपये नफा मिळाला असता.
उत्पादन चांगले येऊनही कोरोनाच्या अस्मानी संकटात लॉकडाऊन लागल्यामुळे बाजारपेठ बंद राहिल्याने केळीला ग्राहक नसल्यामुळे केळी घरातच आहेत. आणखी १० ते १५ दिवसांनी ७०० ते ८०० केळीचे घड मिळणार असल्याचे गणेशने सांगितले.
कर्ज काढून केळी लागवडीचा पहिलाच प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला. मात्र, लॉकडाऊनमुळे बाजारपेठ व फळांची दुकाने बंद राहिल्याने खूप नुकसान झाले आहे. आता आहे त्या जमिनीची विक्री करून कर्ज फेडण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
-गणेश उमवणे,
युवा शेतकरी