एसआरए योजना लागू होऊनही प्रस्तावाचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:01+5:302021-06-21T04:26:01+5:30

पंकज पाटील लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ/बदलापूर : झोपडपट्टीचा विकास व्हावा, यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका क्षेत्रांतही एसआरए योजना लागू ...

Despite the implementation of the SRA scheme, the proposal has not been addressed | एसआरए योजना लागू होऊनही प्रस्तावाचा पत्ताच नाही

एसआरए योजना लागू होऊनही प्रस्तावाचा पत्ताच नाही

Next

पंकज पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ/बदलापूर : झोपडपट्टीचा विकास व्हावा, यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका क्षेत्रांतही एसआरए योजना लागू करण्यात आली होती. योजना लागू असली तरी अद्याप एकही प्रस्ताव पालिकेने पुढे सरकवलेला नाही. त्यामुळे एसआरए योजनेचा कोणताही लाभ अद्याप अंबरनाथ आणि बदलापूर शहरांस झालेला नाही.

मुंबई, ठाणेपुरती मर्यादित असलेली ही योजना अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठीही लागू व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, योजना लागू झाल्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांच्या वतीने एकही एसआरए योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही. दोन्ही शहरांत झोपडपट्टीचा विकास व्हावा, या अनुषंगाने एसआरए योजना उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा होती. अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असतानाही अद्याप ठोस एकही प्रस्ताव पालिकेने सादर केलेला नाही. नगरपालिकेच्या विकास आराखड्यात ज्या भागांवर आरक्षणे टाकण्यात आली, त्या भागातील झोपडपट्टीचा विकास करण्याच्या अनुषंगाने एसआरए योजना राबवावी, अशी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे. त्या अनुषंगाने मे महिन्यात आढावा बैठकही घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ठोस निर्णय अद्यापही झालेला नाही. अंबरनाथ शहरात २८ झोपडपट्ट्या असून त्यांचा विकास व्हावा, यासाठी या आधी पंतप्रधान आवास योजनेतून प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापनादेखील करण्यात आली होती. मात्र, तरीही प्रस्ताव अमलात आलाच नाही. त्यामुळे योजनेला कितपत लाभ मिळेल, याची शाश्‍वती राहिलेली नाही. शहरातील महत्त्वपूर्ण रस्ते आणि इतर आरक्षणे असलेल्या ठिकाणांवरील अतिक्रमण हटविण्याच्या अनुषंगाने एका विशिष्ट झोपडपट्टीवर एसआरए योजना राबवण्याच्या अनुषंगाने पालिका प्रयत्नशील आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

------------------------------

बदलापुरात सध्या तरी गरज नाही

दुसरीकडे बदलापुरात झोपडपट्ट्यांची संख्या कमी असल्याने त्या ठिकाणी अद्याप एसआरए प्रकल्प राबवण्यासंदर्भात कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यातही ज्या झोपडपट्ट्या अस्तित्वात आहेत, त्यातील बहुसंख्य नागरिकांना बीएसयूपी योजनेतील घर मिळणार असल्याने बदलापूर शहरात एसआरए योजनेची नितांत गरज तरी नाही.

Web Title: Despite the implementation of the SRA scheme, the proposal has not been addressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.