बालसंरक्षक समित्यांचा अभाव तरीही जिल्ह्यात पाच बालविवाह रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 11:46 PM2021-01-24T23:46:46+5:302021-01-24T23:47:46+5:30

प्रतिसादात्मक पातळीवर काम आवश्यक

Despite the lack of child protection committees, five child marriages have been prevented in the district | बालसंरक्षक समित्यांचा अभाव तरीही जिल्ह्यात पाच बालविवाह रोखण्यात यश

बालसंरक्षक समित्यांचा अभाव तरीही जिल्ह्यात पाच बालविवाह रोखण्यात यश

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : कोरोनाकाळात राज्यात बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातही पाच बालविवाह रोखण्यात यश आले. हे बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बालसंरक्षक समित्यांचा अभाव असून जिल्ह्यात मुरबाड वगळता सर्व तालुक्यांतील गावपाडे आणि शहरांत समित्या स्थापन झालेल्या नसल्याची बाब उघड झाली.

कोरोनाकाळात बालविवाहांचे प्रमाण जिल्ह्यातही वाढल्याचे मानले जात आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बालसंरक्षण कक्ष, चाइल्ड लाइन आणि पोलीस भाग कार्यरत आहेेत. या यंत्रणांनी कोरोनाच्या आठ महिन्यांच्या कालावधीत पाच बालविवाह रोखले आहेत. यापैकी डोंबिवलीत दोन, उल्हासनगरला दोन आणि ठाण्याच्या कळवा परिसरात एक बालविवाह असे पाच बालविवाह या यंत्रणांनी रोखले आहेत. बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळेच बालविवाहांसंदर्भात प्रतिबंधात्मक आणि प्रतिसादात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर काम करणे आवश्यक आहे. 

बालसंरक्षक समित्या करतात हे काम
स्थानिक पातळीवरील या बालसंरक्षक समितीचे सदस्य त्यांच्या कार्यक्षेत्रात एखाद्या ठिकाणी बालविवाह होत असल्याची माहिती प्राप्त होताच तातडीने त्याची दखल घेऊन त्याची माहिती बालविवाह प्रतिबंधक अधिकारी किंवा सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना देऊन बालविवाह थांबवण्याचे आवश्यक व महत्त्वाचे कार्य या समित्यांकडून केले जाते. त्यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलीस विभाग आणि चाइल्ड लाइन यांचेही कार्य महत्त्वाचे आहे.

या शहरांत एकही समिती नाही
असे असले तरी बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या शहरांत प्रभागनिहाय व ग्रामीणमध्ये गावनिहाय समित्या अद्यापही स्थापन झालेल्या नसल्याचे गंभीर वास्तव बालविवाहासंदर्भातील चौकशीअंती निदर्शनात आले आहे. केवळ मुरबाड तालुक्यात २६९ महसुली गावांत बालसंरक्षक समित्यांची स्थापना झाली असल्याचे निदर्शनात आले आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या सहापैकी एकाही महानगरपालिकेच्या शहरात बालसंरक्षक समिती स्थापन झाली नसल्याची गंभीर बाब प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात समित्यांबाबत उदासीनता
समित्या स्थापन करण्याची उदासीनता जिल्ह्यात आढळून आली आहे. देशात सर्वात जास्त महापालिकांचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. या महानगराच्या कोणत्या कोपऱ्यात काय घडते त्याची माहिती ठेवणाऱ्या यंत्रणांच्या समित्यांप्रमाणे बाल संरक्षक समित्यांची सर्वत्र आवश्यकता आहे.

 

Web Title: Despite the lack of child protection committees, five child marriages have been prevented in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न