ठाणे महापालिकेचे नुकसान झाले तरी फुकट्यांची चमकोगिरी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 01:08 AM2020-01-19T01:08:43+5:302020-01-19T01:13:43+5:30

ठाणे महापालिका हद्दीत ५३० च्या आसपास अधिकृत होर्डिंग्ज आहेत, असा पालिकेचा दावा आहे. मात्र, असे असले तरी शहरात या अधिकृत होर्डिंग्जवर अनधिकृत जाहिरातींचे प्रमाण वाढले आहे.

Despite the loss of Thane Municipal Corporation, the flickering of the fountains continued | ठाणे महापालिकेचे नुकसान झाले तरी फुकट्यांची चमकोगिरी सुरूच

ठाणे महापालिकेचे नुकसान झाले तरी फुकट्यांची चमकोगिरी सुरूच

Next

- अजित मांडके

ठाण्यात कुख्यात गुंड छोटा राजन याला बॅनरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, यानिमित्ताने शहरातील अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ज्या होर्डिंग्जवर काय जाहिराती करायच्या, याचा अधिकार जरी होर्डिंग्ज कंत्राटदारांचा असला, तरी त्यावर अशा पद्धतीने अनधिकृत जाहिराती लागल्या तरी अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करून पालिका यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ठाणे महापालिका हद्दीत ५३० च्या आसपास अधिकृत होर्डिंग्ज आहेत, असा पालिकेचा दावा आहे. मात्र, असे असले तरी शहरात या अधिकृत होर्डिंग्जवर अनधिकृत जाहिरातींचे प्रमाण वाढले आहे.

दुसरीकडे जाहिरात विभागाचे लक्ष्य पूर्ण व्हावे म्हणून या विभागाकडूनही जाहिरातदारांसाठी नवनव्या योजना पुढे आणून शहर विद्रूपीकरणाचा घाट घातला जात आहे. शहरात अशा काही ठिकाणी होर्डिंग्जला परवानगी देण्यात आली आहे की, त्या परवानगीवरूनही अनेक वेळा वादळ उठले आहे. मात्र, काही राजकीय मंडळींच्या आशीर्वादामुळे आणि पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या असलेल्या साटेलोट्यामुळे जाहिरातदारांचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे.

ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागामार्फत आतापर्यंत ३८५ कोटींच्या आसपास वसुली केली आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ५३० खाजगी होर्डिंग्ज आणि बॅनर आहेत. या होर्डिंग्जवाल्यांकडून जाहिरात विभागाला २० कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी पाच कोटी १० लाखांची वसुली आतापर्यंत करण्यात आली आहे. उर्वरित वसुली अद्यापही शिल्लक आहे. शहरात लागणाºया होर्डिंग्ज, बॅनर, दुकानांवरील जाहिराती आदींसह इतर जाहिरातींचे दर वाढविण्यात आले आहेत. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने अखेर आता जाहिरातींचे दर वाढविले. या जाहिरात फलकांवर राजकीय नेत्यांचे वाढदिवस नसतील किंवा अन्य काही कार्यक्रम नसतील, तर जाहिरातदारांकडून जाहिराती प्रसिद्ध होत असतात. परंतु, नेत्याचा वाढदिवस आला किंवा त्याला कोणते पद मिळाले, तर या जाहिरात फलकांवर बेकायदा जाहिराती केल्या जातात. परंतु, या जाहिरात फलकांवर लागणा-या या जाहिरातींशी आमचा काहीही संबंध नसतो, असा दावा पालिकेने केला आहे. यामुळे जाहिरातदारांचे नुकसान तर होतेच, शिवाय ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे, त्यालाही नुकसान सोसावे लागत आहे. राजकीय मंडळींना मात्र यासाठी एक नवा पैसाही खर्च करावा लागत नाही.

जाहिरात धोरणानुसार जाहिरातींचे फलक कुठे असावे, रस्त्याच्या मधोमध नसावेत, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने नसावेत, असे नियम आहेत. परंतु, या नियमांनाही हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. शहरात कुठेही, कसेही, कशाही पद्धतीने सर्रास होर्डिंग्जचे जाळे पसरले आहे. इमारत अधिकृत असो अथवा अनधिकृत, त्यावर होर्डिंग्ज लावली आहेत. आनंदनगर ते ओवळा या पाच ते सात किमीच्या अंतरावर नजर फिरेल, त्या ठिकाणी होर्डिंग्ज दिसून येतात. माजिवडा ते मानपाडा अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर तब्बल २०० होर्डिंग्जचे जाळे उभे आहे. त्यातील सुमारे ७२ होर्डिंग्जलाच परवानगी असल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. कळवा खाडीत तर कांदळवनाची कत्तल करून त्याठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज उभारण्यात आले आहे. नियमानुसार २० फुटांपर्यंत होर्डिंग्ज उभारण्याची परवानगी असताना खाडीत तब्बल १०४ फुटांचे होर्डिंग्ज उभे राहिले आहे. परंतु, पालिकेने त्यावर कारवाई केलेली नाही. तसेच कापूरबावडीनाक्यावरदेखील दोन झाडांचा बळी घेत, त्याठिकाणी होर्डिंग्ज उभारण्यात आले आहे.


इथे नियमांनाच फासला जातो हरताळ
होर्डिंग्जबाबत पालिका प्रशासनाची नियमावली तयार आहे. या नियमावलीमध्ये २० फुटांपर्यंत होर्डिंग्ज असावे, रस्त्याच्या अथवा फुटपाथच्या कडेला रस्त्यावर होर्डिंग्ज असू नये, कोणते रंग असावेत, कोणते असू नयेत, अश्लील मजकूर प्रसिद्ध होऊ नये, फुटपाथपासून चार फूट आतमध्ये होर्डिंग्ज असावे, नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्या ठिकाणी होर्डिंग्ज उभारण्यात येऊच नये तसेच दोन होर्डिंग्जमध्ये किती अंतर असावे, याची माहिती पालिकेने दिलेली आहे. अशी १८ नियमांची ही नियमावली आहे. परंतु, या नियमावलीला हरताळ फासण्याचे काम शहरात सुरू आहे. आनंदनगर ते ओवळापर्यंत रस्त्याच्या कडेला फुटपाथवर अनेक ठिकाणी अशी भव्य होर्डिंग्ज उभी राहिलेली आहेत. परंतु, त्यावर आता कारवाई न करता पीपीचा आधार घेत पालिकेने आता शौचालयांवर, बसथांब्यांवर तसेच फुटपाथवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी जाहिरातींसाठी जागा राखून ठेवली आहे. यातून पालिकेचे उत्पन्न वाढत असले, तरी शहर विद्रूपीकरण होत आहे, याचा साक्षात्कार पालिकेला केव्हा होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राजकीय पुढा-यांची मात्र गुपचिळी
शहरात अशा प्रकारे दिवसागणिक होर्डिंग्ज वाढत असताना त्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही पक्षातील पुढारी मात्र पुढे येताना दिसत नाही. आता तर जांभळीनाक्यावर रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूंनी होर्डिंग्ज उभारण्याचे काम सुरू आहे. परंतु, यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन भविष्यात त्याचा फटका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु, यावर कारवाई करण्याची मागणी करण्यापेक्षा यातून आपले चांगभले कसे होईल, यावर राजकीय मंडळींचा अधिक भर असल्याचे दिसत आहे. अनेक होर्डिंग्जच्या कंत्राटामध्ये तर काही राजकीय मंडळींचाही वाटा असल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे कारवाई तरी कशी होणार, असा सवाल आहे. त्यातही याच होर्डिंग्जवर या मंडळींना फुकटच्या वाढदिवसाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास मुभा मिळत असते. त्यामुळे त्यांनासुद्धा या होर्डिंग्जवर कारवाई व्हावी, अशी इच्छा नसते.

 

Web Title: Despite the loss of Thane Municipal Corporation, the flickering of the fountains continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.