सहा लाखांचे उत्पन्न असूनही नायगाव रेल्वे स्थानक दुर्लक्षित

By admin | Published: January 21, 2016 02:26 AM2016-01-21T02:26:30+5:302016-01-21T02:26:30+5:30

दिवसाला सरासरी ५० हजारांच्या आसपास प्रवासी, सुमारे सहा लाखांचे उत्पन्न असलेले नायगाव रेल्वे स्टेशन पूर्वीपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिल्याने येथे कोणत्याही प्राथमिक

Despite six lakhs of income, Naigaon railway station is neglected | सहा लाखांचे उत्पन्न असूनही नायगाव रेल्वे स्थानक दुर्लक्षित

सहा लाखांचे उत्पन्न असूनही नायगाव रेल्वे स्थानक दुर्लक्षित

Next

वसई : दिवसाला सरासरी ५० हजारांच्या आसपास प्रवासी, सुमारे सहा लाखांचे उत्पन्न असलेले नायगाव रेल्वे स्टेशन पूर्वीपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिल्याने येथे कोणत्याही प्राथमिक सुविधा नाहीत. परिणामी, प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या स्टेशनवरून मुंबईत नोकरी-व्यवसाय करणारेच प्रवास अधिक असल्याने सतत धकाधकी आणि धावपळीच्या युगात वावरणाऱ्या प्रवाशांना स्टेशनवरील गैरसोयी जणू काही अंगवळणी पडल्या आहेत.
कित्येक वर्षे रखडलेला पूर्व-पश्चिमेस जोडणारा सब वे काही महिन्यांपासून सुुरू करण्यात आला आहे. पण, रात्रीच्या वेळी सब वेत सुरक्षारक्षकाची व्यवस्था नसल्याने महिलांना सब वे ने ये-जा करण्याची भीती वाटत असते. सब वेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पावसाळ्यात पाणी गळत असते. तसेच पाणी साचून राहिलेले असते. साफसफाई केली जात नसल्याने सब वेत घाण आणि दुर्गंधी पसरलेली असते. सब वेतील लाद्या अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत. स्टेशनवर कायमस्वरूपी पोलीस नसल्याने रात्री-अपरात्री महिला प्रवाशांना ये-जा करताना काळजी घ्यावी लागते. रात्रीच्या वेळी स्टेशनवर भिकारी आणि गर्दुल्ले निवाऱ्यासाठी येतात. पोलीस नसल्याने त्यांचा उपद्रव प्रवाशांना सहन करावा लागतो. स्टेशनवर पुरेसे पंखे नाहीत. विजेची सोय नसल्यानेही स्टेशनवर अधिकतर उजेड कमी असल्याने अंधुक प्रकाशात गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या विशेषत: महिला प्रवाशांची गैरसोय होताना दिसते. चारही फलाटांवर बसण्यासाठी पुरेशी बाके नाहीत. रेल्वे फलाटांची उंची जास्त असल्याने गाडीतून चढउतार करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. स्टेशनवर सीसीटीव्हीची व्यवस्था नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास वसई रेल्वे स्टेशनवर येऊन पोलिसांकडे तक्रार करावी लागते.
स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिमेला एकेक तिकीट खिडकी आहे. त्यातही दोन्ही बाजूला एकेक खिडकी उघडी असते. पूर्वेला तिकीट खिडकीजवळ दोन आणि पश्चिमेला तीन एटीव्हीएम मशिन्स आहेत. स्टेशनवर आरपीएफ आणि रेल्वे पोलीस दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास कुणाकडे धाव घ्यायची, असा महिला प्रवाशांचा सवाल आहे. गेल्या वर्षभरात स्टेशन परिसरात रेल्वे अपघातात ११ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. कित्येक वेळा रेल्वे अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने मदत मिळणे खूपच कठीण असते. स्टेशनवर सोयीसुविधांची कमतरता असून स्टेशनबाहेरही प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी दुरून मोटारसायकलीवरून येतात. पण, स्टॅण्डमध्ये अपुरी जागा असल्याने प्रवासी बाहेर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गाड्या पार्क करून दिवसभरासाठी निघून जातात. (प्रतिनिधी)

Web Title: Despite six lakhs of income, Naigaon railway station is neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.