खड्ड्यातील दूषित पाणी आले ग्रामस्थांच्या नशिबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 02:05 AM2019-04-24T02:05:50+5:302019-04-24T02:06:03+5:30
२० वर्षांपासून टंचाईचा करत आहेत सामना
- रोहिदास पाटील
अनगाव : भिवंडी तालुक्यातील वळणाचापाडा, गवणीपाडा, दामूचापाडा, पागीपाडा या चार पाड्यांत पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न भेडसावत असतानाच तालुक्यातील गोदामपट्ट्यातील लोनाड ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील चौधरपाडा येथील बापदेवपाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. पाड्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
बापदेवपाड्यात १५ ते २० वर्षांपासून येथील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाड्याशेजारी खड्डा आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचलेले असते. ते पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने आरोग्यास धोकादायक असते. हे पाणी इतर कामासाठी वापरले जाते, तर पिण्यासाठी पाणी लांबून आणावे लागते. यामुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
येथील महिलांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करून पाणीसमस्या दूर करण्याची मागणी केली आहे. पंचायतीने या पाड्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला, मात्र पाड्याच्या बाजूला असणाऱ्या काहींनी त्याला विरोध केल्याने येथील महिला आणि त्यांच्यामध्ये वाद झाल्याने पंचायतीने टँकरने पाणीपुरवठा बंद केल्याने येथील पाड्यातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा उपविभागाच्या वतीने या पाड्यात बोअरवेल का केली नाही. पाणीपुरवठा विभाग झोपला होता का, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. तालुका पाणीटंचाईमुक्त झाल्याचे कागदोपत्री दाखवणारे अधिकारी आपल्यावर कारवाईची वेळ आल्यावर पाणीटंचाईच नसल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतात. गेल्या वर्षी ‘लोकमत’ ने पाणीटंचाईचे विदरक सत्य मांडल्यावर पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राऊत व शाखा अभियंता भास्करराव यांनी पाणीटंचाई नसल्याचे जि.प. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम समिती सभापती यांना सांगितले होते. मात्र, ‘लोकमत’ने वास्तव मांडल्याने पाणीपुरवठा विभागाला अखेर मान्यच करावे लागले. या विभागाला असे दुर्लक्षित गाव, पाडे का दिसत नाहीत, वर्षभर ते काय करतात, असा प्रश्न विचारला जात आहे.
लोनाड ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील या पाड्यात टंचाईचे संकट आहेच. मात्र, या पाड्यात जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. रस्ता नसल्याने येथील नागरिकांना येजा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तर, रुग्ण व मुलांना पावसाळ्याच्या दिवसांत शाळेत गुडघाभर चिखलातून पावसात जाण्याची वेळ येते. या पाड्यात रस्ता तर नाहीच. सार्वजनिक स्वच्छतागृहही नाही.
गरोदरपणात माहेरीच राहावे लागते
पाणी नाही, त्यातच पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गरोदर महिलेला माहेरी राहूनच प्रसूती करावी लागते. तिच्या पोटात दुखायला लागले, तर तिला रुग्णालयात नेण्यासाठी रस्ताच नाही, अशी माहिती वैशाली जाधव यांनी दिली.
या पाड्यात पाण्याची समस्या गंभीर आहे. येथील महिलांनी पंचायतीकडे तक्र ार केली आहे. महिलांना सोबत घेऊन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे नेले होते. त्यावेळी पाहणी करून ग्रामसेवकांनी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. तो बंद केला आहे. तो पुन्हा सुरू न केल्यास श्रमजीवी संघटना आंदोलन करेल.
- डॉ. स्वाती खान-सिंह, कार्यकर्ती, श्रमजीवी संघटना
बापदेवपाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, वाद झाल्याने बंद करण्यात आला आहे. लवकरच सुरू करण्याबाबत सरपंचांसह गटविकास अधिकारी यांना माहिती देणार आहे.
- आर.डी. आंधळे, ग्रामविकास अधिकारी