खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगताना पसार झालेला १७ वर्षांनी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:43 AM2018-02-09T02:43:44+5:302018-02-09T02:43:53+5:30
मूळच्या उत्तर प्रदेशमधील वेदप्रकाश वीरेंद्रकुमार सिंह (४८) याला ठाणे न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप सुनावली होती. पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगताना संचित रजेवर सुटल्यावर तो पसार झाला.
ठाणे : मूळच्या उत्तर प्रदेशमधील वेदप्रकाश वीरेंद्रकुमार सिंह (४८) याला ठाणे न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप सुनावली होती. पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगताना संचित रजेवर सुटल्यावर तो पसार झाला. ठाणे शहर पोलिसांनी तब्बल १७ वर्षांनी उत्तर प्रदेशातून त्याला अटक करून वर्तकनगर पोलिसांच्या हवाली केले आहे.
खूप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर १९९७ साली ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्या गुन्ह्यातील वेदप्रकाश येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. १८ जून २००१ ला तो १४ दिवसांच्या संचित रजेवर सुटला होता. तेव्हापासून तो संचित रजेवरून परत कारागृहात हजर न झाल्याने अखेर २०१३ साली वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पसार असलेला वेदप्रकाश अस्तित्व लपवून उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे राहत असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी मिळाली होती. त्यानुसार ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, सुनील जाधव, पोलीस नाईक संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड यांचे पथक उत्तर प्रदेशला गेले. उत्तर प्रदेशातील स्पेशल टास्क फोर्सची मदत घेऊन त्याला अटक केली. २०१३ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी त्याचा ताबा वर्तकनगर पोलिसांकडे दिला आहे.
>काय होते प्रकरण?
मालमत्तेच्या वादावरून रामनारायण खरबानी सिंग यांच्यावर ५ डिसेंबर १९९४ ला प्रयागसिंग भारती सिंग, वेदप्रकाश वीरेंद्रकुमार सिंग, अशोककुमार उपेंद्र सिंग यांनी धारदार शस्त्राने वार केले आणि त्यांचा खून केला. न्यायालयाने त्यांना जन्मठेप दिली होती.