मेथएम्फटामाइनची तस्करी करणाऱ्यास शीळ-डायघर येथून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 09:58 PM2020-01-29T21:58:28+5:302020-01-29T22:07:43+5:30
शीळ डायघर भागात मेथएम्फटामाइन या अमली पदार्थाची तस्करी करणाºया शरीफ अब्दुल लतीफ गाझी (२७) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून ५१ ग्रॅम वजनाच्या मेथएम्फटामाइनच्या ४९९ गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मेथएम्फटामाइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या शरीफ अब्दुल लतीफ गाझी (२७, रा. जुईगाव, नवी मुंबई, मूळ गाव-उत्तर प्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून सात लाख ४८ हजार ५०० रुपयांच्या ५१ ग्रॅम वजनाच्या मेथएम्फटामाइनच्या ४९९ गोळ्या हस्तगत केल्या आहेत.
कल्याणफाट्याजवळील मुंब्रा-पनवेल रस्त्यावर असलेल्या हॉटेल न्यू सुनील बार अॅण्ड रेस्टॉरंटजवळ एक व्यक्ती मेथएम्फटामाइन (मेथ) हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक, पोलीस हवालदार संभाजी मोरे, भिलारे, सुनील जाधव, पोलीस नाईक अजय साबळे आणि किशोर भामरे आदींच्या पथकाने २८ जानेवारी रोजी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून मेथएम्फटामाइनच्या ४९९ गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरुद्ध शीळ-डायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याने हे मेथ कोणाकडून आणले? तो याची कोणाला विक्री करणार होता, याबाबतची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.