आघाडी सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणामुळे शिक्षणाची अधोगती- नरेंद्र पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 02:07 PM2021-09-08T14:07:57+5:302021-09-08T14:08:05+5:30
कल्याणमध्ये भाजप शिक्षक आघाडीचे आंदोलन तहसील कार्यालयासमोर आंदोलन
डोंबिवली: राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर, मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक व विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असून ठाकरे सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणांमुळे शिक्षणक्षेत्राची अधोगती होत असल्याचा आरोप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला. पक्षाच्या कल्याण जिल्हा शिक्षक आघाडीने शिक्षणक्षेत्रातील मागण्यांसाठी बुधवारी कल्याण तहसील कार्यालयासमोर आयोजित केलेल्या आंदोलनप्रसंगी ते बोलत होते.
शिक्षकांना वेळेवर १ तारखेला वेतन मिळावे, वरिष्ठ व निवडश्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण तातडीने आयोजित करणे, पी एफ, मेडिकल बिले त्वरित मंजूर करावी, शिक्षण सेवकांची सातव्या वेतन आयोगप्रमाणे वाढ करण्यात यावी, जुनी पेंशन योजना सुरू करा, शिक्षक शिक्षकेतरांना त्रिस्तरीय १०-२०-३० ची योजना लागू करा, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके त्वरित देण्यात यावीत. ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
शिक्षक भरती सुरू करण्यात यावी, ठाणे जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवावा, संस्थाचालकांना आरटीई प्रतिपूर्ती वेळेवर द्यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन कल्याण तहसिलदार व कल्याण शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावेळी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, सहसंयोजक विकास पाटील, कोकण विभाग संयोजक एन एम भामरे, कार्यवाह विनोद शेलकर व कल्याण जिल्हा अध्यक्ष सुभाष सरोदे, ज्ञानेश्वर घुगे, अनिरुद्ध चव्हाण, शरद शिंदे व इतर कार्यकर्ते शिक्षक उपस्थित होते.