अंबरनाथ शहर हरित करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:06 AM2019-06-08T00:06:28+5:302019-06-08T00:06:35+5:30
विशेष अभियान : ३० हजार झाडांचा संकल्प
अंबरनाथ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंबरनाथ शहर हरित शहर होण्याचा निर्धार केला असून यंदा शहरात ३० हजार झाडे लावण्यात येणार आहे. सायकल सिटी निर्माण करण्याचा संकल्प सोडण्यात आला, त्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.
नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पर्यावरण दिनानिमित्त विशेष अभियान आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पुन्हा विजयी झाल्याबद्दल नगरपालिका प्रशासन आणि शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, मुख्याधिकारी देविदास पवार, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, उद्योजक विश्वनाथ पनवेलकर आदी उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे, आमदार डॉ. किणीकर, शहरप्रमुख वाळेकर यांनी पनवेलकर सभागृह ते हुतात्मा चौकापर्यंत सायकली चालवून अभियानाला सुरुवात केली.
अंबरनाथमध्ये ३० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी देविदास पवार यांनी केले.लोकसहभागासाठी आनंदवृक्ष, स्मृतिवृक्ष, अक्षय लागवड, शुभमंगल, माहेरची साडी वृक्षलागवड आदी योजना हाती घेतल्या आहेत. बचत गटामार्फत सायकली देण्यात येणार आहेत. त्यासाठी सायकल स्टॅण्डची निर्मिती केली जाणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने पालिका प्रशासन राबवत असलेल्या अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे. निसर्गाची हानी थांबवावी, असे आवाहन नगराध्यक्षा वाळेकर यांनी केले.
शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. सायकलींसाठी नगरपालिकेने १० लाख रु पये मंजूर केले आहेत.
रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या सोसायट्यांना करात सवलत देण्याचा प्रयत्न विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष विजय पवार यांनी केले.