स्वत:च्याच कर्मचाऱ्याला ठरवले ‘अनोळखी’; मीरा रोड रेल्वे पोलिसांचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:50 PM2019-02-11T23:50:33+5:302019-02-11T23:50:55+5:30
मीरा रोड रेल्वेस्थानकाच्या हद्दीत शनिवारी रेल्वेत खलाशाचे काम करणा-या चेतन मुरलीधर मोटवानी (३३) यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याला अनोळखी दाखवल्याने त्याचा मृतदेह नातेवाइकांना ताब्यात देण्यास रविवार उजाडला.
भाईदर : मीरा रोड रेल्वेस्थानकाच्या हद्दीत शनिवारी रेल्वेत खलाशाचे काम करणा-या चेतन मुरलीधर मोटवानी (३३) यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याला अनोळखी दाखवल्याने त्याचा मृतदेह नातेवाइकांना ताब्यात देण्यास रविवार उजाडला. रेल्वे कर्मचा-याला अनोळखी ठरवणाºया पोलिसांच्या बेदरकार कारभाराविरोधात मृताच्या नातेवाइकांत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वसई रेल्वे क्वार्टर्समध्ये राहणारा चेतन हा पश्चिम रेल्वेत २०१० मध्ये खलाशीपदावर रुजू झाला होता. तत्पूर्वी त्याचे वडील चर्चगेट येथील कार्यालयात शिपाई होते. त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर चेतनला रेल्वे प्रशासनाने नोकरी दिली होती. शनिवारी तो वसईहून बोरिवली येथे चर्चगेट लोकलने कार्यालयीन कामासाठी जात असताना दुपारी ३ वाजताच्या सुमारास मीरा रोड ते दहिसरदरम्यान धावत्या लोकलमधून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मीरा रोड रेल्वे पोलिसांनी चेतनचा मृतदेह रेल्वेस्थानकात आणला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ पश्चिम रेल्वेचे ओळखपत्र आढळून आले. यानंतर, पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. हे सोपस्कार पार पाडूनही पोलिसांनी त्याच्या शवविच्छेदनपूर्व अर्जात चेतन अनोळखी असल्याची नोंद केली.
दरम्यान, चेतनची आई धन्वंतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता मीरा रोड रेल्वे पोलीस चौकीत दाखल झाली. यानंतर, तब्बल तीन तासांनंतर चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भार्इंदर पश्चिमेकडील भारतरत्न स्व. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन केंद्रात २४ तास डॉक्टरांना उपस्थित राहण्याचे निर्देश असतानाही ते उपस्थित नसल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. रात्री ८ वाजेपर्यंत चेतनची आई केंद्रात त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हजर असताना तिला दुसºया दिवशी येण्यास सांगण्यात आले. रविवारी चेतनची आई व भाऊ करण त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले असता अर्जातील ‘अनोळखी’ नोंदीमुळे तो त्यांच्या ताब्यात देण्यात आला नाही. त्यासाठी चेतनचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणण्याचे फर्मान सोडण्यात आले. ते दाखवल्यानंतर रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास चेनतचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातानंतर चेतनच्या खिशात ओळखपत्राचा पुरावा सापडूनही चेतनची अनोळखी म्हणून नोंद करणाºया पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी चेतनच्या नातलगांनी केली आहे.
चेतनच्या अपघाती मृत्यूची पोलिसांनी अनोळखी म्हणून नोंद केल्याने त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सुरुवातीला पोलिसांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता. परंतु, स्थानिक समाजसेवक अनिल नोटीयाल यांच्या प्रयत्नामुळे २४ तासांनंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.
- करण मोटवानी, मृत चेतनचा भाऊ
चेतनची अनोळखी नोंद चुकीने झाली असून यापुढे अशी चूक होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- मीरा रोड रेल्वे पोलीस