भाईंदरच्या ८ मित्रांनी फटाके फोडण्याचे केले बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 10:38 PM2019-10-29T22:38:01+5:302019-10-29T22:39:08+5:30
फटाक्यांमुळे होणाराया ध्वनी व वायु प्रदुषणासह ज्येष्ठ, लहानांना होणाराया त्रासाचा केला विचार
धीरज परब
मीरारोड - शाळेपासून एकमेकांचे मित्र असलेल्या आणि पुर्वी फटाक्यांचा शौक असणाराया ८ मित्रांनी यंदा पासुन फटाके न फोडण्याचा निर्धार अमलात आणला आहे. भाईंदरच्या बालाजी नगर परिसरात राहणाराया या १० ते १३ वी मध्ये शिकणाऱ्या मित्रांनी फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायु प्रदुषण, पर्यावरणाचा राहास तसेच लहान मुलं, रुग्ण व ज्येष्ठांना होणारा त्रास यासाठी यंदापासून फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला. फटाके म्हणजे पैशांचे नासाडी असून त्या पैशांचा वापर सामाजिक कार्यासाठी करण्याचा विचार या मुलांनी बोलून दाखवला.
फटाके फोडणे हे धर्म - संस्कृतित नसले तरी गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी म्हणजे फटाके फोडणे असे समिकरण झालेले आहे. फटाक्यां मुळे प्रचंड वायु आणि ध्वनी प्रदुषण होते. फटाक्यांचा धूर हा मानवी आरोग्यासाठी अतिशय घातक असुन या काळात लोकांना श्वसनाचे आदी विकार जडतात. पर्यावरणाचा यातुन राहास होत असतो. केवळ मनुष्यांनाच नव्हे तर पक्षी, पशु व जिवांनादेखील फटाक्यांचा जाच असह्य असतो. लहान बालके, रुग्ण, ज्येष्ठ नागरीकांना फटक्यांच्या आवाज व धूरा मुळे त्रास सहन करावा लागतो.
फटक्यांच्या वाजवण्यावर वेळेचे बंधन असुन फटक्यां विरोधात शासन आदी जनजागृतीचे संदेश देत असते. पण प्रत्यक्षात काटेकोर अमलबजावणी होताना दिसत नाही. हरित फटाक्यांचा पर्याय देखील शासन अजुन लोकांना उपलब्ध करुन देऊ शकलेले नाही. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या व्यवसाय आणि विक्रीत होणारी अब्जो रुपयांची उलाढाल देखील या पर्यावरण आणि मानवी आरोग्याला घातक अशा फटाक्यांना प्रोत्साहन देण्यास कारणीभूत मानली जाते.
फटाक्यांचे आकर्षण लहानां मध्येच नव्हे तर मोठ्यां मध्ये देखील असते. हल्ली तर महागडे फटाके फोडणे देखील प्रतिष्ठेचे समजले जाते. परंतु भार्इंदरच्या बालाजी नगर मधील ८ विद्यार्थी मित्रांनी यंदाच्या दिवाळी पासुन फटाके फोडण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील अवी जैन, कृष्णा मुंदडा, आदर्श बोहरा, विशेष मुंदडा, विशाल पुरोहित, कुणाल केसवानी आणि गोविंद चौधरी हे बालाजी नगरच्या तिरुपती कॉम्पलॅक्स मध्ये राहणारे आहेत. तर हर्ष बागरी हा बालाजी नगर मध्येच रहात असला तरी तो पुर्वी तिरुपती कॉम्पलॅक्स मध्येच रहायचा.
हे सर्व जण शाळेत असल्या पासुनचे मित्र आहेत. सर्व १६ ते १८ वयोगटातील असुन विशाल, विशेष, आदर्श व कृष्णा हे १० वीचे विद्यार्थी आहेत. गोविंद ११ वी मध्ये, अवी हा १३ वीत तर हर्ष, कुणाल हे दोघे १२ वीत शिकतायत. मध्यमवर्गिय कुटुंबातील ही मुलं असुन फटाके फोडण्याचा त्यांना लहानपणा पासुन शौक होता. कृष्णाच्या घरचे तर भरपुर फटाके आणुन फोडतात. पण यंदा घरच्यांनी फटाके आणले असले तरी कृष्णाने ते फोडण्यास नकार दिलाय. विशाल, आदर्श, विशेष, गोविंद, अवी, हर्ष व कुणालने देखील फटाके फोडण्याची इच्छा नसल्याचे घरच्यांना सांगुन टाकले.
फटाक्यांसाठी इतके पैसे खर्च करुन शेवटी ते कचरायातच जातात. त्यापेक्षा गरजु - गरीबासाठी दिवाळीत काही मदत करु शकलो तर उलट त्यांच्या चेहरायावर देखील आपण दिवाळीचा आनंद आणु शकतो. लहान मुलं, रुग्ण, वडिलधारायांना फटाक्यांच्या आवाज आणि धूरा मुळे होणारा त्रास आम्ही विचारात घेतला असता आम्हाला जाणवले की, फटाके फोडुन आपण साध्य मात्र काहीच करत नाही आहोत. उलट त्यातुन लोकांना त्रास देत असल्याने फटाके फोडण्याची इच्छाच मनातून निघून गेल्याचे हे विद्यार्थी सांगतात.
फटाक्यांमुळे आपल्याला इतका त्रास होतो तर निरागस पक्ष्यांना किती त्रास होत असेल. ध्वनी व वायु प्रदुषण होऊन पर्यावरणाचा राहास होण्यात आम्हाला भागीदार बनायचे नाही असे ही मुलं सांगतात. पर्यावरणासह मानवी आरोग्याला घातक अशा ध्वनी व वायु प्रदुषणासह पैशांची नासाडी रोखण्याचा विचार करुन या पुढे फटाके न फोडण्याचा निर्धार करणाराया या मित्रांचे परिसरात कौतुक होत आहे.